‘
पुणे: येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगच्या (एमआयटी एसओसी) विद्यार्थ्यांनी हॉरीझॉन एआय हॅकेथॉन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. अमेरिकेतील मियामी विद्यापीठाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत, “सिकल सेल डिटेक्टर” या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी मधुर पाटील, अनुराग अहिरराव, अर्णव बुळे आणि निधी फोफळीये यांचा समावेश असलेल्या संघाने तिसरा क्रमांक पटकावत तब्बल १००० डाॅलर्सचे पारितोषिक जिंकले आहे.
“सिकल सेल डिटेक्टर” हा एक अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-आधारित उपाय असून, जो सिकल सेल आजाराचे वेळीच आणि अचूक निदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

विशेषतः दुर्गम आणि आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्ये हा प्रकल्प मोठी मदत करू शकतो. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्वरित निदान आणि उत्तम उपचार पद्धती उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी प्रा.डाॅ.रंजना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली.

विद्यार्थ्यांच्या या यशानंतर विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.सुरेश कापरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
