नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. मात्र, तूर्तास तरी आपण ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित केले आहे, असे वक्तव्य गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने केले.२४ वर्षीय गिलने गेल्या हंगामात सर्वाधिक ८९० धावा केल्या होत्या. यंदा सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल १० फलंदाजांमध्ये गिलचा समावेश आहे. असे असले तरी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी गिलचे भारतीय संघातील स्थान निश्चित नाही. भारतासाठी खेळण्यापेक्षा मोठे काहीच नाही. मात्र, मी केवळ ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा विचार करत राहिलो, तर तो माझा सध्याचा संघ (गुजरात टायटन्स) आणि माझ्यावर अन्याय असेल. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी माझी निवड झाली तर उत्तमच. परंतु तूर्तास तरी माझे पूर्ण लक्ष ‘आयपीएल’वर आहे. कर्णधार म्हणून अन्य खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे आणि स्वत: सर्वोत्तम कामगिरी करून अन्य खेळाडूंचे काम सोपे करण्याचा माझा प्रयत्न आहे,’’ असे गिल म्हणाला.