पुणे : १७ मे ते २५ मे दरम्यान जपानच्या काबेमध्ये होणाऱ्या पॅरा अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील गोळाफेक प्रकारात आझम स्पोर्ट्स अकादमीच्या सचिन सर्जेराव खिलारे यांची निवड करण्यात आली आहे. गतवर्षी पॅरीस येथे झालेल्या स्पर्धेत सचिनने एफ-४६ या विभागात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
मूळ सांगलीच्या असणारा सचिन गेल्या ४ वर्षांपासून आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर सराव करत आहे. सरावात सातत्य राखणाऱ्या सचिनने सुरुवातीपासून दमदार खेळाच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले. बंगळूर येथील झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सचिनने सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर प्रथमच आशियाई पॅरा अॅथलेटिक स्पर्धेत खेळताना १६.०३ मीटर गोळाफेक करताना सुवर्णपदक पटकावले होते.
मागीलवर्षी २०२२-२३ साली झालेल्या पॅरा अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने १६.२३ मीटर गोळाफेक करताना एफ-४६ या विभागामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. यावर्षी देखील सचिन जपान येथे होणाऱ्या पॅरा अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत एफ-४६ या विभागामध्ये सहभागी होत आहे.
स्पर्धेसाठी त्याला महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख यांनी स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.