पुणे : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग,नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय बँड स्पर्धा संपन्न झाल्या.राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, उपविभागप्रमुख सचिन चव्हाण, अधिव्याख्याता संघ प्रिया वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.श्री.काठमोरे म्हणाले, शालेय जीवनामध्ये उत्तम नागरिक घडविण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी विविध स्पर्धा आवश्यक आहे. बँड स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सांघिक भावना, राष्ट्रप्रेम आदी भावना वाढीस लागतात. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःशी स्पर्धा केल्यास मिळणारे यश शाश्वत असते.डॉ.आवटे म्हणाल्या, राज्यस्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यापूर्वीच यश संपादन केले आहे. हे कौतुकास्पद आहे. बँड स्पर्धेमधून खिलाडूवृत्ती वाढीस लागते. स्पर्धेमध्ये यश किंवा अपयश हे महत्त्वाचे नसून स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन स्वतः आनंद घेणे हे सुद्धा महत्त्वाचे असते.डॉ. सावरकर म्हणाल्या, राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या संघांना मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावरील विभागांतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्तरावर महाराष्ट्रातील संघानी यश मिळविल्यास राष्ट्रीय स्तरावर विजेते संघांचे सादरीकरण होईल. संघाना शुभेच्छा देवून त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेचे नियम व अटी सांगितल्या.या बँड स्पर्धेमध्ये पाईप बँड व ब्रास बँड या प्रकारामध्ये मुलांच्या गटातून सहा संघानी व मुलींच्या गटातून सहा संघांनी सादरीकरण केले. राज्यस्तरावरील या स्पर्धेमध्ये ३५० विद्यार्थी व २४ शिक्षक सहभागी झाले.
राज्यस्तरीय बँड स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
ब्रास बँड-मुले (प्रथम) – संजीवनी सैनिकी विद्यालय, कोपरगाव. मुली ( प्रथम ) – सेंट एलॉयसिस कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय, भुसावळ.
पाईप बँड-मुले (प्रथम)-राजाराम बापू पाटील सैनिकी विद्यालय, इस्लामपूर. मुली (प्रथम)-भोसला सैनिकी विद्यालय, नाशिक.