भारताचा युवा स्टार डी गुकेश बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा विश्वविजेता ठरला आहे.चॅम्पियनशिपच्या १४व्या आणि शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली, यात गतविजेता लिरेन याने एक छोटीशी चूक केली, जी त्याला महागात पडली. यासह वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी भारताच्या गुकेशने विश्वविजेता बनून विक्रम केला. विशेष म्हणजे तो १८वा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनही आहे.सिंगापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनचा डिंग आणि भारताचा गुकेश यांच्यात चुरशीची लढत होती. डिंगने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. अशा परिस्थितीत त्याने गतविजेता म्हणून या स्पर्धेत प्रवेश केला होता. तर गुकेशने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये चॅलेंजर म्हणून या चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश केला होता. विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा तो विश्वनाथन आनंद याच्यानंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. गुरुवारी (१२ डिसेंबर) चॅम्पियनशिपची १४वी आणि शेवटची फेरी गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यात झाली. यापूर्वी खेळल्या गेलेल्या १३ फेऱ्यांमध्ये दोघांनी प्रत्येकी २ लढती जिंकल्या होत्या, तर उर्वरित ९ लढती अनिर्णित राहिले होत्या. अशा स्थितीत दोघांचे समान ६.५ गुण होते.
अशा स्थितीत ही लढत निर्णायक ठरली. ही लढतही अनिर्णित राहिली असती तर दोघांचे प्रत्येकी ७ गुण झाले असते आणि त्यानंतर टायब्रेकरने निर्णय घेतला गेला असता पण चेन्नईचा चमत्कारी ग्रँडमास्टर गुकेशने हे होऊ दिले नाही. गुकेशने शेवटच्या सामन्यात चिनी ग्रँडमास्टरचा पराभव केला आणि ७.५ – ६.५ अशा फरकाने विजेतेपद पटकावले.