नवी दिल्ली – भारताच्या दीप्ती जीवनजीने जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये दीप्ती जीवनजीने सुवर्ण पदक पटकावत ४०० मीटरच्या शर्यतीत विश्वविक्रमाची नोंद केली.

दीप्ती जीवनजीने ४०० मीटरचे अंतर ५५.०७ सेकंदात पूर्ण केले. दीप्तीने पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अमेरिकन ॲथलीट ब्रेना क्लार्कचा विक्रम मोडला. दीप्तीने विश्वविक्रम करत सुवर्ण भारताच्या झोळीत टाकले. दीप्तीने वयाच्या २० व्या वर्षी पहिले जगज्जेतेपद पटकावले. दीप्ती जीवनजीने ५६.१८ सेकंदात अंतर गाठून आशियाई स्तरावर विक्रम केला होता. पण आता दीप्तीने विश्वविक्रम करत सुवर्ण पदक भारताच्या झोळीत टाकले.तिने २०२२ मध्ये धावण्यास सुरुवात केली होती.अमेरिकेच्या ब्रेना क्लार्कने पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५५.१२ सेकंदांचा विक्रम केला होता, जो आता मोडला गेला आहे. पॅरिसमध्ये तुर्कीच्या आयसेल ओंडरने ५५.१९ सेकंदात अंतर पूर्ण केले आणि इक्वेडोरच्या लिझानशेला अँगुलोने ५६.६८ सेकंदात शर्यत पूर्ण केली. आयसेल ओंडर दुसऱ्या तर लिझानशेला अँगुलो तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताने चार पदके जिंकली
आत्तापर्यंत भारताने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये एकूण चार पदके जिंकली आहेत. दीप्तीने भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले. यापूर्वी १ रौप्य आणि २ कांस्यपदके आली होती. आता भारताला एकूण किती पदके मिळतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जागतिक पॅरा ?थलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ शुक्रवार, १७ मे पासून सुरू झाली असून २५ मे रोजीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.