गुजरातमधील जामनगरच्या राजघराण्यानं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याची या राजघराण्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जामसाहेब शत्रुशल्यसिंहजी महाराज यांनी शुक्रवारी आपला वारस जाहीर केला. भारतीय संघाकडून १५ कसोटी आणि १९६ एकदिवसीय सामने खेळलेला ५३ वर्षीय अजय जडेजा हा जामनगर राजघराण्याचा वंशज आहे. त्यांचा जन्म १९७१ मध्ये नवानगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामनगरमध्ये झाला. शत्रुसल्यासिंहजींचे चुलत बंधू आणि त्यांचे वडील दौलतसिंहजी जडेजा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पत्राद्वारे त्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.
टाइम्स ऑफ इंडियानं या पत्राच्या आधारे वृत्त दिलं आहे. ‘दसरा हा सण विजयाचं प्रतीक आहे. अजय जडेजानं माझा उत्तराधिकारी होण्याचा प्रस्ताव स्वीकारून या शुभ दिवशी मी माझा पेच सोडवला आहे. मला खात्री आहे की अजय जडेजा जामनगरच्या लोकांसाठी वरदान ठरेल आणि समर्पणभावानं त्यांची सेवा करेल. मी त्याचा खूप आभारी आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.