पुणेः येथील मिलिटरी इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या आर्मी रोईंग नोडवर नुकत्याच पार पडलेल्या ४९व्या महाराष्ट्र राज्य आऊटडोउर रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या डाॅ.विश्वनाथ कराड क्रीडा अकादमीने तीन सुवर्ण, एक रौप्य व एका कांस्य पदकासह बाजी मारली आहे. वरिष्ठ डब्ल्यू-२ गटात स्नेहा सोळंकी, भाग्यश्री घुले या जोडीने तर सब-ज्युनियर (१५ वर्षांखालील) गटात प्रतीक पवार व सांघीक एसजेबी-4 गटात वैभव लाड, श्रेयस गर्जे, प्रथमेश कांदे, कार्तिक कांबळे यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर ज्युनियर (१८ वर्षांखालील) गटात ओम लाड व शुभंकर फड या जोडीला सुवर्णपदक अगदी थोड्या फरकाने हुकल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर एसजेबी-२ गटात वैभव लाड व कार्तिक कांबळे यांनी कांस्य पदक कमावले. या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मोहित दुबे, डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
‘इनडोअर’मध्ये एकतर्फी वर्चस्व
इनडोअर रोईंगमध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावताना एकूण सहा सुवर्णपदकांसह या प्रकारात आपले वर्चस्व गाजवले. विद्यापीठाने वरिष्ठ गटात एम१ई, एलडब्ल्यू१इ, मिश्र४ई, एलमिश्र४ई आणि सब-ज्युनिअर (१५ वर्षांखालील) बी१ई व बी२ई गटात सुवर्ण कामगिरी केली. यामध्ये आदित्य केदारी, भाग्यश्री घुले, स्नेहा सोळंखी, योगेश बोरोले, प्रतीक पवार, प्रथमेश कांदे, श्रेयश गर्जे या खेळाडूंचा समावेश होता.