पुणे:ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या तैलचित्रांचे ऑलिम्पिकपटू देवेंदर वाल्मिकी, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे अनावरण करण्यात आले. या तैलचित्राबद्दल खाशाबा जाधवांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, उपाध्यक्ष प्रदिप गंधे, संजय शेटे, सहायक संचालिका भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी संजोग ढोले, दिपाली पाटील, चनबस स्वामी, क्रीडा लेखक संजय दुधाणे, प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील तसेच क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू उपस्थित होते.
प्रसिद्ध चित्रकार प्रकाश बोरूडे यांनी ३ बाय ४ फूटाचे खाशाबा जाधव यांचे तैलचित्र रेखाटले आहे. तैलचित्राखाली स्व. खाशाबा जाधव यांच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील यशाची माहिती देण्यात आली आहे.
महराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्यावतीने खाशाबा जाधवांचा १५ जानेवारी हा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्यांच्या नावाने राज्य कुस्ती स्पर्धेचेही शासनाकडून दरवर्षी आयोजन करण्यात येते.