cricket News | पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) आणि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक यांच्यात पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतर सहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढत रंगणार आहे.
नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात शार्दूल शिंदेच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर पीडीसीसी बँकेने पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर नऊ गडी राखून मात केली. पुणे पीपल्स बँकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांत ५ बाद ८७ धावा केल्या. यात संतोष बोबळेने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. मंगेश वाडकरने २४ धावांची खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना शुभम वालगुडे शून्यावरच बाद झाला. यानंतर शार्दूल शिंदे आणि संतोष यांनी आक्रमक खेळी करून पीडीसीसी संघाला ७.१ षटकांत जिंकून दिले. शार्दूलने नाबाद ५०, तर संतोषने नाबाद ३१ धावांची खेळी केली.

यानंतर झालेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने राजर्षी शाहू सहकारी बँकेवर आठ गडी राखून मात केली. राजर्षी बँकेने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ७८ धावा केल्या. कॉसमॉस बँकेने विजयी लक्ष्य ६.५ षटकांत दोन गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले.
धावफलक :
१) पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक – १० षटकांत ५ बाद ८७ (संतोष बोबळे ३९, मंगेश वाडकर २४, रोहित कदम २-१५, अक्षय पवार १-१०, नितीन खरात १-१५) पराभूत वि. पीडीसीसी – ७.३ षटकांत १ बाद ९१ (शार्दूल शिंदे नाबाद ५०, संतोष नाबाद ३१, मंगशे वाडकर १-१२). सामनावीर – शार्दूल शिंदे
२) राजर्षी शाहू सहकारी बँक – १० षटकांत ४ बाद ७८ (वैभव पायगुडे २०, रोहन बलकवडे १९, कृषीराज सौदकर नाबाद १३, आर. जगताप १-११, प्रसाद शिंदे १-९, मयुरेश जाधव १-२०) पराभूत वि. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक – ६.५ षटकांत २ बाद ७९ (मयुरेश जाधव ४२, रोहित ओव्हळ २०, रणजित जगताप नाबाद १०, सागर निवंगुणे १-१७, दीपक वैराट १-७). सामनावीर – मयुरेश जाधव.


