पुणे, – : उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई योगासन नॅशनल्स २०२५-२६ मध्ये प्रभावी कामगिरी करत शाळेचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर उंचावला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील आशा मॉडर्न स्कूलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी योगाच्या प्राचीन कलेतील आपले कौशल्य, शिस्त आणि क्रीडा गुणांचे उत्तम प्रदर्शन केले.
या स्पर्धेत आठवीच्या वर्गातील निरल वाडेकरने लयबद्ध एकल प्रकारात सुवर्णपदक, तर पारंपारिक वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक पटकावत उत्कृष्ट योग कलाकार म्हणून स्वतःची छाप पाडली.
शाळेच्या पारंपारिक गट स्पर्धेत आद्या पांडे, निरल वाडेकर, आभा पांडे, इरा ठाकूर आणि रिद्धिया नायर यांनी सहभाग घेत शिस्तबद्ध सादरीकरण करत रौप्यपदक जिंकले. या संघाची कामगिरी टीमवर्क, संतुलन आणि समन्वयाचे प्रतीक ठरली.
या उल्लेखनीय यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलच्या संचालिका अनिष्का मालपाणी, विश्वस्त यशवर्धन मालपाणी आणि प्राचार्य शारदा राव यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्रशिक्षक स्वप्नील जाधव आणि श्रीमती किरण वाडेकर यांच्या अथक मार्गदर्शनाचा मोठा वाटा असून, त्यांचे समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण हेच या कामगिरीचे खरे बळ ठरले आहे.
योगाबद्दलची विद्यार्थ्यांची आवड, शिस्त आणि निष्ठा यामुळेच ध्रुव ग्लोबल स्कूलने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्टतेची छाप राष्ट्रीय स्तरावर उमटवली आहे.


