मुंबईच्या नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी पुण्याहून ३ शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थी गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईकडे निघत आहेत. पुण्यातील एड्स बाधित मुलांचे संगोपन व शिक्षण करणारी मानव्य संस्था (४५ विद्यार्थी) तुळापुर वळूज येथील ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ईश्वरपूरम संस्था (४५ विद्यार्थी) आणि निंबाळकर गुर्जरवाडी येथील सुमती बालवन शाळा (१५० विद्यार्थी) शिक्षक व स्वयंसेवकांसह गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी या तीन शाळांमधून सकाळी ६ वाजता वातानुकुलीत बसेस मधून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. एक्झिम इंटिग्रेटेड क्लब (EIC ट्रस्ट) यांचा सहयोग यासाठी लाभला आहे अशी माहिती या संकल्पनेचे जनक व बँकिंग तज्ञ शशांक वाघ आणि EIC ट्रस्टचे खजिनदार व या प्रकल्पाचे प्रमुख प्रदीप चव्हाण यांनी दिली.
त्यांनी सांगितले की हे विद्यार्थी ८-९ वर्षांपासून १५ वर्षे वयोगटातील असून गरीब कुटुंबातील आहेत. एक्सप्रेस वे, अटल सेतू मार्ग, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी समुद्र असे या विद्यार्थ्यांना दाखवून झाल्यानंतर दुपारी हे विद्यार्थी डी. वाय. पाटील स्टेडीयम मध्ये येतील. एक्सप्रेस वे, अटल सेतू मार्ग, मुंबई, समुद्र, स्टेडीयम मध्ये क्रिकेट मॅच बघणे या सर्वांची अनुभूती हे विद्यार्थी प्रथमच घेणार आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की या सर्व विद्यार्थी व सोबतच्या शिक्षक व स्वयंसेवकांना सकाळी नाश्ता, दुपार व रात्रीचे भोजन तसेच स्टेडीयम मध्ये नाश्ता व कोल्ड ड्रिंक दिली जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना विशेष टी-शर्ट आणि टोपी देखील दिली जाणार आहे. भारतीय महिला खेळाडूंना चीअर अप करण्यासाठी या विद्यार्थ्यांसमवेत ढोल-लेझीम व शंख-ध्वनी पथक देखील नेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मॅच बघतानाचा विद्यार्थ्याचा फोटो त्याला भेट म्हणून दिला जाईल. यानिमित्त विशेष गाणे बसविण्यात आले असून त्याच्या तालावर स्टेडीयम मध्ये डान्स करीत हे विद्यार्थी भारतीय महिला खेळाडूंना प्रोत्साहन देतील असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी ‘बुक माय शो’ ने एकाच ब्लॉकमधील ३०० तिकिटे उपलब्ध करून दिलेली असून टी. व्ही. ऐवजी प्रत्यक्ष स्टेडीयममध्ये तेदेखील मुंबईत जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच बघण्याचा आनंद मिळणार असल्यामुळे या विद्यार्थांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे असे शशांक वाघ आणि प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.


