· काम करणाऱ्या महिलांसाठी सरकारी संस्थांची कार्यक्षमता आणि जीवनाची गुणवत्ता यासाठी उच्च मानांकन
· कौशल्य आणि रोजगार संधींसाठीही उच्च मानांकन
पुणे, : वैविध्य, समानता आणि समावेश (डीईआय) सोल्यूशन क्षेत्रातील भारतातील अग्रणी आणि भारतातील आघाडीची कार्यस्थळ संस्कृती सल्लागार कंपनी असलेल्या अवतार ग्रुपने आज आपल्या तिसऱ्या ‘महिलांसाठी भारतातील सर्वश्रेष्ठ शहरे‘ (टॉप सिटीज फॉर वुमन इन इंडिया – टीसीडब्ल्यूआय) सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या पुण्याला या सर्वेक्षणात पहिल्या पाच शहरांमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. काम करणाऱ्या महिलांच्या दृष्टीने सर्वाधिक समावेशक, सुरक्षित, सोयिस्कर आणि शाश्वत शहर म्हणून पुण्याला हा मान मिळाला आहे. काम करणाऱ्या महिलांसाठी सरकारी संस्थांची कार्यक्षमता आणि जीवनाची गुणवत्ता यासाठी उच्च मानांकन मिळवून पुण्याने या सर्वेक्षणात पाचवे स्थान मिळविले आहे.
‘महिलांसाठी भारतातील सर्वश्रेष्ठ शहरे‘ निर्देशांक या सर्वेक्षणात आदर्श शहरे आणि सर्वोत्तम पद्धती निश्चित केल्या जातात. तसेच त्यात शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी संस्था, धोरणकर्ते आणि व्यक्तींसाठी एक चौकट उपलब्ध करून दिली जाते. देशभरातील महिलांच्या प्रगतीसाठी ही एक प्रमुख चालक शक्ती आहे. ‘अवतार’च्या प्राथमिक संशोधनासोबतच सेंटर फॉर मॉनिटरिंग द इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई), जागतिक बँक, गुन्ह्यांच्या नोंदी आणि नियमित श्रमशक्ती सर्वेक्षणासह विविध डेटा स्रोतांना एकत्र करून हा निर्देशांक संकलित केला जातो. ‘अवतार’च्या संशोधनात एफजीडी आणि एका देशव्यापी सर्वेक्षणाचा समावेश आहे. हे सर्वेक्षण फेब्रुवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आले. त्यामध्ये ६० शहरांतील १६७२ महिलांनी भाग घेतला.
या सर्वेक्षणानुसार, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, गुरुग्राम आणि कोईम्बतूर ही २०२४ मध्ये महिलांसाठी सर्वश्रेष्ठ दहा शहरे आहेत.याविषयी माहिती देताना पत्रकार परिषदेत बोलताना अवतार ग्रुपच्या संस्थापक-अध्यक्ष डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या, “शहरे म्हणजे संधीचा पाया असतो. स्त्रिया कशा जगतील, काम करतील आणि भरभराट करतील हे शहरात ठरते. त्यामुळे, महिलांची प्रगती आणि समावेशकता वाढवण्यासाठी आपल्या शहरांची मुख्य तत्त्वे आणि सांस्कृतिक जडणघडण स्पष्टपणे समजून घेणे महत्त्वाचे असते. ‘अवतार’चा वार्षिक ‘महिलांसाठी भारतातील सर्वश्रेष्ठ शहरे’ नेमके हेच काम करतो. त्यात डेटा-केंद्रित आणि पुरावा-आधारित दृष्टिकोनाचा वापर करण्यात येतो. आणि, २०४७ पर्यंत विकसित भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी, आपल्याला भारतीय महिला व्यावसायिकांनी पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी होणे गरजेचे आहे. जेव्हा शहरे खरोखरच लिंग-समावेशक होतील आणि महिलांच्या शक्तीला अनुकूल वातावरण देऊ शकतील, तेव्हाच हे शक्य आहे. महिलांना केवळ सुरक्षित रस्ते, सुलभ आरोग्यसेवा आणि शिक्षण आणि परवडणारी जीवनशैली देणे एवढाच याचा अर्थ नाही, ते मुख्यत्वे भरपाईचे उपाय आहेत. महिलांच्या आर्थिक यशासाठी स्पर्धात्मक क्षेत्र आणि व्यावसायिक नेते म्हणून त्यांना भरभराट करण्याच्या संधी देणेही महत्त्वाचे आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून महिलांच्या जीवन व करिअरला अनुकूल वातावरण निर्माण करूया.”
या सर्वेक्षणासाठी देशासाठी आर्थिक योगदानाच्या आधारे भारतातील १२० शहरांची निवड करण्यात आली. अवतारचे संशोधन आणि प्रचलित सरकारी माहितीनुसार, ‘शहर समावेशन स्कोअर’च्या आधारे शहरांची क्रमवारी लावण्यात आली.
या सर्वेक्षणाच्या विविध निकषांमध्ये, सरकारी कार्यक्षमतेमध्ये तिरुवनंतपुरम (८.१५) आणि पुणे (७.०६) यांना सर्वोच्च स्थान मिळाले. तसेच, जीवनाच्या गुणवत्तेच्या बाबतीतही पुण्याला (७.५०) कोईम्बतूर (७.५४) आणि चेन्नईच्या (७.०५) खालोखाल स्थान मिळाले.