मंडल अथवा मंडळ म्हणजेच सोप्या शब्दांत वर्तुळ. मग, वर्तुळ म्हटलं कि एक केंद्रबिंदू आला, एक बंद आणि परिपूर्ण गोल आला. याचं गोलाला कधी-कधी फिरणारे चक्र म्हणून सुद्धा संबोधण्यात येते. म्हणजेच मंडल एकाच वेळी परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि त्याचवेळी सतत फिरणारे, प्रवाही यंत्र सुद्धा, जे कुठल्याशा प्रवासाला निघालेय. कलेच्या माध्यमातून अध्यात्म साधता येतो. आणि हीच प्रक्रिया मांडला आर्टमधून प्रकर्षाने जाणवते. ओम पुर्णमदः पूर्णमिदं…या श्लोकाप्रमाणे मी देखील एक पूर्ण आहे, ज्याला पूर्णब्रह्म तत्वाने बनवले आहे. मी बनवतोय ते मंडल देखील पूर्ण आहे. मग, मी निराशेच्या गर्तेत कसा काय जाऊ शकतो? इथून सुरु होतो मंडलातून healing चा प्रवास. मंडलात समतोल, समानता या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. It’s actually, can be another word for Perfection! मग जो कोणी या Perfection कडे वाटचाल करत असेल तो अस्थिर कसा? Perfection साधतांना, त्या प्रक्रियेकडे बघतांना आपण देहभान विसरतो. जेव्हा आपण देहभान विसरून एखादी कृती करतो, तेव्हा ती आपोआपच मानसिक, वैचारिक पातळीवरही परिणाम घडवून आणते.
मंडल रेखाटत असतांना त्यातला समतोल साधण्याची प्रक्रिया आपसूकचं घडू लागते. मंडलाच्या मध्यभागी केंद्रबिंदू (Focal Point) आहे आणि संपूर्ण मंडल याभोवताली रेखाटला जातो. तो रेखाटत असतांना किंवा बघत असतांना आपण या भागाकडे एकाग्र होत जातो, स्थिर होत जातो. इतर चित्रांमध्ये कलाकार आणि मंडल बघणारा दोघेही अश्या प्रकारच्या perfection शी बांधील नसतात. ते मुक्तविहार करतात. मंडला आर्ट बाबतीत या गोष्टींना सतत जपावं लागतं. नव्हे…तर हा समतोल साधण्याचा एक मजेशीर छंदच जणू हळू हळू त्या व्यक्तीत अंकुरित व्हायला लागतो.
मनात आलेले नैराश्य, अस्थिरता यांची जागा आता मंडलातल्या समतोलाने व्यापली जाऊ लागते. मंडल रेखाटण्याची प्रक्रियाच इतकी सुंदर आहे कि ती सतत करावीशी वाटते किंवा मंडल बनत असतांना देखील त्याकडे बघत रहावसं वाटतं. मंडलाचं केंद्रस्थान सतत आपल्याकडे मन आकर्षून घेऊ लागतं आणि यातूनच नकळतपणे मन शांत व्हायला सुरवात होते. म्हणूनच मंडला आर्ट बनवतांना मानसिक व्याधींचे बरे होणे, मन सक्षम होत जाणे या सगळ्याच गोष्टी साध्य होतात. मंडला आर्टला यासाठीच मानसशास्त्रात एक साधन म्हणून वापरता येते.
मंडला आर्टला ऐतिहासिक परंपरा आहे. अनेक धर्मांमध्ये याचा वापर देवांचे प्रतिनिधित्व दर्शवण्यासाठी आणि अध्यात्मिक प्रवासाचे प्रतीक म्हणून करण्यात आला आहे. श्रीयंत्र shriyantra यात वापरले जाणारे मंडळ पण परंपरा, अध्यात्म विकास आणि healing यासगळ्याचं एक सुरेख संयोजन आहे. जैन आणि बौद्ध धर्मांमध्ये मंडलला जीवन ते मृत्यूचा प्रवास दर्शवण्यासाठी तसेच meditation साठी पण वापरण्यात येते. पाश्चिमात्य संस्कृतीतही याचा वापर अंतर्मनातील चेतना जागृत करण्यासाठी केला जातो. हिंदू धर्मात रांगोळी काढण्याची पद्धत आहे. पूर्वापार चालत आलेली ठिपक्यांची रांगोळी दुसरंतिसरं काही नसून मंडलाचंच एक स्वरूप आहे. म्हणून सडा घालून, सारवून जेव्हा ठिपक्यांची रांगोळी सकाळच्या प्रहरी अंगणात रेखाटली जायची, तेव्हा दिवसभर श्रमणाऱ्या महिला वर्गाच्या मनात प्रसन्नता आणि शक्ती आपसूकच प्रवेश करायची. आपली कला सादर करण्याचा, मनाला सक्षम करण्याचा सुंदर मार्ग आणि अनमोल ठेवा आपल्या संस्कृतीनेच आपल्याला दिलाय. हे आपण विसरता काम नये.
थोडक्यात सांगायचं झालं तर, मंडला आर्ट हे जरी आज नव्याने वृद्धिंगत होत असतांना दिसत असलं तरी त्याला खूप मोठी परंपरा आहे. जवळ जवळ प्रत्येक धर्मात मंडलाने आपलं स्थान निर्माण केलाय. आणि जेव्हा धार्मिक अध्ययनात एखाद्या गोष्टीला स्थान प्राप्त होतं, तेव्हा ते मानसिक रोगांवरही परिणाम करतांना दिसून येतं. म्हणूनच, मंडला आर्ट नुसतीच कला नाही तर एक पूजेचं आणि healing च साधन आहे.