पिंपरी :- चिखली येथे महापालिकेच्या वतीने मानवेल जातीच्या बांबूच्या रोपांची लागवड करण्यात येत आहे. या लागवडीचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग व फार्मर्स फॉर फॉरेस्ट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथील जाधव सरकार चौक, स्पाईन रोड येथे मानवेल जातीच्या बांबू रोपांची लागवड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे, रविकिरण घोडके, उद्यान अधिक्षक राजेश वसावे, फार्मर्स फॉर फॉरेस्ट संस्थेच्या संस्थापिका कृतिका रविशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य अविनाशे, प्रकल्प समन्वयक प्रशिल चौधरी, साहिल, स्वयंसेवक जगदिश, मनिश, सचिन तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
शहर हरित करणे तसेच जैव कुंपण निर्मिती करीता महापालिकेच्या वतीने एक लाख बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी बाबूंच्या रोपांची लागवड करण्यात येत असून यामध्ये फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांसारख्या विविध संस्थांचे सहकार्य महापालिकेस मिळत आहे.
या उपक्रमाअंतर्गत महापालिका आणि फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थेच्या वतीने उद्योगांमुळे तसेच वाहनांमुळे होणारे प्रदुषण, सार्वजनिक बागा आणि रस्त्यांवरील हिरव्यागार जागांचा अभाव या समस्या टाळण्यासाठी चिखली येथील स्पाईन रोडवर बांबूंच्या रोपांची लागवड करण्यात येत आहे.
स्पाईन रोडवरील बांबू लागवडीमुळे हवेची गुणवत्ता राखणे, रहदारीस पर्यावरणपुरक वातावरण निर्माण करून देणे आणि परिसरास वेगळी ओळख निर्माण करून देण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे नागरिकांना बांबूसारख्या विविध वृक्षांची माहिती मिळणार असून जैवविविधता आणि हिरव्यागार जागांचे महत्व पटवून देण्यासही मदत होणार आहे. यासाठी बांबू लागवडीच्या ठिकाणी क्युआर कोड लावण्यात येणार असून नागरिक हा क्युआर कोड स्कॅन करून उपक्रमाबद्दल तसेच वृक्षांच्या प्रजातीबद्दल माहिती जाणून घेऊ शकतात.