पुणे — महाराष्ट्रातील पहिली हायड्रोजन बस अखेर पुण्यात रस्त्यावर धावली!औंध येथे झालेल्या या *‘ट्रायल रन’*ने राज्यात हरित वाहतूक क्रांतीची नवी सुरुवात केली आहे. पुढील सात दिवस या हायड्रोजन बसची विविध सात मार्गांवर चाचणी होणार असून, चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
ही चाचणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा), पीएमपीएमएल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. औंध येथील ‘मेडा’ कार्यालयापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत व पुन्हा मेडा कार्यालय असा या बसचा मार्ग ठेवण्यात आला होता.

या वेळी बसमध्ये पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, ‘मेडा’चे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया, प्रकल्प महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे डॉ. आशिष लेले, सीआयआरटीचे संचालक देवेंद्र सिंग, इंडियन ऑईलचे आलोक सिंग, तसेच पीएमपीचे अधिकारी व आरटीओ अधिकारी उपस्थित होते.
पंकज देवरे म्हणाले,
“राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसची ट्रायल रन पुण्यात यशस्वी झाली आहे. पुढील सात दिवस सात वेगवेगळ्या मार्गांवर ही चाचणी घेणार आहोत. त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत खरेदी प्रस्ताव ठेवला जाईल. मंजुरी मिळाल्यावर या बस लवकरच पुणेकरांच्या सेवेत येतील.”
तर आनंद रायदुर्ग यांनी सांगितले,
“महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या ‘महाराष्ट्र ग्रीन एनर्जी पॉलिसी’ अंतर्गत या बससाठी ‘मेडा’ ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या बसवर शासनाकडून ३० टक्के सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे जवळपास एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. या बसमुळे प्रदूषण शून्य होईल आणि पेट्रोल-डिझेलवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.”
‘टाटा मोटर्स’द्वारे ही अत्याधुनिक बस तयार करण्यात आली आहे. प्रत्येक बसची किंमत अंदाजे अडीच ते तीन कोटी रुपयांपर्यंत असली, तरी शासनाच्या अनुदानामुळे ती सुमारे दोन कोटी रुपयांत पीएमपीएमएलला उपलब्ध होणार आहे.
हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या या बसमुळे पुणे शहर हरित उर्जेकडे वाटचाल करत आहे. प्रदूषणमुक्त, इंधन-बचत करणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उभारण्यात पुण्याने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे.