मुंबई – : नांदणी मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मठानेदेखील याचिका दाखल करावी, आणि त्यामध्ये राज्य शासनाचा समावेश करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, नांदणी मठाचे प्रतिनिधी आणि विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या ३४ वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. तिचे मठाशी भावनिक नाते असून स्थानिक जनतेची ती श्रद्धास्थान बनली आहे. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन कायदेशीर मार्गाने तिचे पुनरागमन घडवून आणण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सविस्तर भूमिका मांडली जाईल. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे निकष आणि उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींचा विचार करून आवश्यक ती पावले उचलली जातील. हत्तीणीच्या देखभालीसाठी डॉक्टरसह विशेष पथक स्थापन केले जाईल. गरज भासल्यास ‘रेस्क्यू सेंटर’सारखी यंत्रणा उभारली जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
या प्रकरणात नागरिकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातून बाहेर गेलेल्या सर्व हत्तींची माहिती वन विभागाने गोळा करावी, असे निर्देश दिले. यावेळी खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.

या बैठकीस खासदार धैर्यशील माने, विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अशोक माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे पूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.