पंढरपूर : रायगड जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी वाड्यांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणींवर चिकित्सक अभ्यास करणारे श्री. तांबवे आबासो जगन्नाथ यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. “माध्यमिक स्तरावरील आदिवासी विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर त्यांनी डॉ. शशिकांत लक्ष्मण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले.
रायगडमधील ९७० हून अधिक आदिवासी वाड्यांमध्ये आजही शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, आणि मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर अपुऱ्या आहेत . दुर्गम डोंगराळ भाग, भाषेची अडचण, कच्चे रस्ते, आणि शाळेची अपुरी सोय या समस्या आजही कायम आहेत, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटलेली आहे . या पार्श्वभूमीवर डॉ. तांबवे यांचे संशोधन केवळ शैक्षणिक क्षेत्रासाठीच नव्हे, तर सामाजिक बदलासाठीही मार्गदर्शक ठरणार आहे.या यशाबद्दल विद्याप्रसारिणी सभा चौक संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. शोभाताई अविनाशरावजी देशमुख व सचिव योगेंद्रभाई शहा यांनी डॉ. तांबवे सरांचा शाल, श्रीफळ आणि बक्षीस देऊन सत्कार केला. सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौकचे मुख्याध्यापक श्री. मोळीक, पर्यवेक्षक श्री. देवानंद कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. तांबवे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
डॉ. तांबवे यांच्या संशोधनामुळे रायगडसह राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, बोलीभाषेतील अडचणी, अपुरी शाळा, आणि सामाजिक व आर्थिक अडथळ्यांवर प्रकाश पडला आहे . शासनानेही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वस्तीशाळा, बालभवन, मातृभाषेतील पुस्तके, आणि विशेष उपयोजनांसारख्या विविध योजना राबवल्या असल्या तरी, प्रत्यक्षात अनेक समस्या कायम आहेत . अशा परिस्थितीत डॉ. तांबवे यांचे संशोधन धोरणकर्त्यांसाठी आणि समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे.