पिंपळे गुरव : – गेली कित्येक वर्षे स्व. लक्ष्मणभाऊ असतील, अश्विनीताई असतील किंवा आता शंकरभाऊ असतील हे सक्रिय राजकारणात असूनही त्यांनी कधीही सत्ता डोक्यात जाऊ दिली नाही. आपल्या पिंपळे गुरव परिसराचा आमूलाग्र कायापालट करणारे आणि नागरिकांच्या अडीअडचणीला धावून येणाऱ्या शंकर जगताप यांना यावेळी संधी मिळाली आहे. आणि या संधीचे पुन्हा एकदा सोने करून आमच्या या हक्काच्या माणसाला विधानसभेत पाठविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असा निर्धार पिंपळे गुरवमधील सर्व ग्रामस्थांनी केला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) भारतीय जनता पक्षाच्या वतीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या पहिल्याच यादीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातुन शंकर जगताप यांचे नाव जाहीर करण्यात आले.
जगताप यांचे नाव जाहीर झाल्याचे समजताच पिंपळे गुरवमधील सर्व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत गावातील स्थानिक जगताप, कदम, देवकर, काशीद, जवळकर, नवले, गांगर्डे, कवडे, जांभुळकर, भालेकर, डोळस, शिंदे, लोखंडे, आदियाल कुटुंबातील ज्येष्ठ ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण त्याचबरोबर व्यापारी आणि विविध सामाजिक मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीला गावातील ज्येष्ठ मंडळींनी मार्गदशन केले. “चिंचवड विधानसभेचे नेतृत्व करण्याचा मान आपल्या पिंपळे गुरवला मिळणे ही बाब प्रत्येक ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब आहे. मागील ३० ते ३५ वर्षांपासून स्व. लक्ष्मणभाऊ यांनी ही कुटुंबप्रमुखाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची जबाबदारी अश्विनीताई आणि शंकरभाऊ यांनी सक्षमपणे पेलली. आपल्या गावच्या विकासाबरोबरच त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातही विकासाची गंगा आणली.””त्यांच्या याच कष्टाला आणि निष्ठेला फळ मिळाले असून आज शंकर जगताप हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभेच्या रणांगणात उतरले आहेत. या राजकीय रणसंग्रामात आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उतरुया आणि या रणसंग्रामात विक्रमी मताधिक्याचा विजयी पताका चिंचवडमध्ये फडकवूया. आणि याची सुरुवात आपण आपल्या गावापासून करूया”, असा निर्धार सर्व उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केला.