पुणे, : पुण्याकडून खेड-शिवापूरकडे जाणाऱ्या कात्रज नवीन बोगद्याच्या अलीकडे पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळून पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जवळपास पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महामार्गावर निम्मा रस्ता माती, दगड आणि झाडाझुडपांनी व्यापल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरडीचा ढिगारा हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले असून, वाहतुकीसाठी केवळ एकाच लेनचा वापर सुरु आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनचालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. प्रशासनाकडून सतत मार्गदर्शन करण्यात येत असून, ढिगारा पूर्णपणे हटेपर्यंत या मार्गावर प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या इतर भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये १०१ मिमी पावसाची नोंद झाली असून, लोणावळा, हवेली, गिरीवन, माळीण आणि पुरंदर परिसरातही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.
प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, बोगद्याजवळील दरड हटवून मार्ग पूर्ववत सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.