पुणे: येथील एमआयटी आर्ट, डिजाईन, टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे आणि आंतरराष्ट्रीय कौन्सिल ऑफ ज्युरिस्ट्स (लंडन) यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यावसायिक नैतिकता आणि मानवी मूल्ये” या विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचा उद्देश कायदा व्यवसायातील नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि विद्यार्थ्यांना न्याय व मूल्यांसाठी प्रेरित करणे होता.
कार्यक्रमाची सुरुवात एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांच्यासोबत कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी विद्यापीठातील अधिष्ठाता आणि संचालक उपस्थित होते. प्रा. डॉ. कराड यांनी कायदा व्यवसायाचे महत्त्व सांगताना म्हटले की, “कायदा व्यवसाय हा केवळ एक करिअर नसून, तो न्याय व सत्यासाठी लढणारे श्रेष्ठ क्षेत्र आहे, जे व्यक्तीला समाजात मान व प्रतिष्ठा देते.”
कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आदिश अग्रवाल, अध्यक्ष, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ज्युरिस्ट्स (लंडन), यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, “कायदा व्यवसाय समाज घडविण्याचे व न्यायासाठी लढण्याचे शक्तिशाली साधन आहे. हा व्यवसाय नैतिकता व समर्पणाची मागणी करतो आणि व्यक्तीला समाजात नेतृत्व करण्यासाठी प्रेरित करतो.”
कार्यक्रमानंतर डॉ. आदिश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधला. त्यांनी त्यांच्या अनुभवांचे शेअरिंग करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. ही कार्यशाळा डॉ. सपना सुकृत देव, अधिष्ठाता, स्कूल ऑफ लॉ, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.आदित्य केदारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.