पुणे : बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सने मला आयुष्यामध्ये पैसा, प्रसिद्धी, कला सर्व काही दिले. या महाविद्यालयाने मला केवळ शिक्षण दिले नाही, तर माझ्यातील माणूस घडवण्यासाठी मदत केली. तरुण विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या जीवनाचा पुरेपूर उपयोग करून आपले आयुष्य घडवावे, कारण कॉलेजचे दिवस म्हणजे आयुष्याचा पाया असतो. हा पाया मजबूत झाला तर तुम्ही अतिशय समृद्ध असे आयुष्य जगू शकता, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी MOHAN JOSHI यांनी व्यक्त केली.
बीएमसीसी BMCC माजी विद्यार्थी संघटनेतर्फे महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात आयोजित बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ४० व्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील गुणवंत माजी विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन मोहन जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राज्याचे जमाबंदी व भूमी अभिलेख आयुक्त डॉ. सुहास दिवसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर, संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव सुहास पटवर्धन, उपाध्यक्ष संजीव साबळे, खजिनदार सुहास धारणे यावेळी उपस्थित होते. अभिनेते प्रसाद ओक आणि उद्योजक डॉ. सौरभ गाडगीळ यांना प्राइड ऑफ बीएमसीसी पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर डॉ. संजय कंदलगावकर आणि डॉ. वसुधा गर्दे यांना गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एअर व्हॉइस मार्शल जयंत इनामदार यांना शहीद मेजर कुणाल गोसावी शौर्य पुरस्कार, रायकुमार नहार यांना उद्योग भूषण पुरस्कार, प्रसाद पानसे यांना स्वर्गीय वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार, अथर्व कर्वे यांना सुहास कुलकर्णी नाट्य पुरस्कार, अमृता नातू यांना स्वर्गीय बाळासाहेब सरपोतदार पुरस्कार, मिहीर तेरणीकर यांना कै. कांता मगर क्रीडा पुरस्कार, वैष्णवी आडकर यांना कै. शिवराम फळणीकर पुरस्कार तर मृगनयनी शिंदे यांना विशेष पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.
मोहन जोशी म्हणाले, मी माझ्या आयुष्यामध्ये टेम्पो चालवण्यापासून नाटकांपर्यंत विविध प्रकारची कामे केली. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले या प्रसंगी मला धीर देणारे संस्कार हे कॉलेजच्या जीवनात झाले. कॉलेजच्या जीवनाने खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याचा पाया घातला. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या दिवसांचा पुरेपूर उपयोग करून घ्या.
डॉ. सुहास दिवसे म्हणाले, गेल्या ४० वर्षांपासून अविरत बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स माजी विद्यार्थी संघटना कार्यरत आहे. ही देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना आहे. माजी विद्यार्थी एकत्र येऊन ज्यावेळी एखादे काम करतात तेव्हा ते केवळ त्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर समाजाला पुढे घेऊन जात असतात.
प्रसाद ओक म्हणाले, हा पुरस्कार घेताना मी अत्यंत भावनिक झालो आहे. या वास्तूचा मी आयुष्यभर ऋणी राहील. राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पेक्षाही माझ्या कॉलेजने मला दिलेला पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो. कॉलेजमुळे मला हा दिवस पाहता आला.
डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले परंतु ज्या कॉलेजमध्ये मी घडलो, त्या कॉलेजमध्ये मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी अत्यंत संस्मरणीय आहे. माझ्या स्वतःच्या महाविद्यालयाने एक प्रकारे माझ्या कर्तुत्वाला दिलेली ही शाबासकीची थाप आहे. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स हे एक प्रकारे माझे दुसरे घर आहे.
डॉ. वसुधा गर्दे म्हणाल्या, ४५ वर्षांहून अधिक काळ मी या महाविद्यालयाशी एक प्राध्यापक म्हणून जोडली गेलेली आहे आयुष्यामध्ये मिळालेला विविध यशाची साक्षीदार हे महाविद्यालय आहे.
डॉ. संजय कंदलगावकर म्हणाले, बीएमसीसी विद्यार्थ्यांसाठी केवळ एक महाविद्यालय नव्हे तर शैक्षणिक मंदिर आहे. या कॉलेजमध्ये येऊन मला ५० वर्षे झाली या महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक म्हणून जसे काम केले, तसेच या ठिकाणी शिक्षणही घेतले म्हणजे एक प्रकारे माझे संपूर्ण आयुष्य घडविण्याचे काम या महाविद्यालयाने केले आहे.
रायकुमार नहार म्हणाले, या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारीची मला जाणीव झाली आहे. गेल्या ४० वर्षांपासून अविरत कार्य करणाऱ्या या संघटनेमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा महाविद्यालयाशी जोडता येते हे सुद्धा या संघटनेचे यश आहे, असेही त्यांनी सांगितले. अरुण निम्हण यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. अरुण निम्हण यांनी स्वागत केले.