पुणे: शहरातील गणपती मंडळे आणि ढोल ताशा पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्यासोबत शहरातील विविध ढोल ताशा पथकातील वादक भगिनींनी राखी बांधत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
युवा वाद्य पथकाच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संकल्पनेला सर्वच वाद्य पथकांतील वादक भगिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. शहरातील रुद्रांग, नूमवि, आदिमाया, शिवाय नमः, नाद वरदहस्त, स्वराज्य, वादक युवा मंच, शिवतेज आदी ढोल ताशा पथकातील भगिनींनी पुनीत बालन यांना राखी बांधली. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन युवा वाद्य पथकाचे विश्वस्त गणेश देशपांडे, अमर आढाळगे, स्वप्निल काळे, अपूर्वा राजमाने, अनघा महाशब्दे यांनी केले होते.
शेकडो भगिनींनी राखी बांधल्यानंतर बालन भावुक झाले. गणपती मंडळे आणि वाद्य पथकांनी भारतीय संस्कृतीचे जतन केले आहे.अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे एक भाऊ म्हणून माझे कर्तव्य आहे. भावा-बहिणीच्या नात्यातील हा बंध अधिक दृढ झाला असून, वादक भगिनींच्या रूपाने असंख्य बहिणींचा आशीर्वाद मला लाभला आहे, अशी भावना पुनीत बालन यांनी व्यक्त केली.