पुणे : महाराष्ट्राची आज सर्कस झाली आहे. राजकारणाच्या क्षेत्रात सध्या बोलल्या जाणाऱ्या भाषेला धरबंध राहिलेला नाही. अशा परिस्थितीत नाठाळ राजकारण्यांचे कान धरून त्यांना वठवणीवर आणण्याचे, खडे बोल सुनविण्याचे काम साहित्यिकांनी करावे, असे मत नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. राजकारणी व्यक्तींना साहित्य संमेलनांमध्ये साहित्यिकांचे विचार ऐकायला बोलवावे, बोलायला नको असे सांगून पूर्वीच्या मराठी साहित्यिकांच्या अंगात, मनात मराठी बाणा रुजलेला दिसत होता, परंतु ती धमक आज कमी झालेली जाणवते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात कार्यक्रम झाला. महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी राजमुद्रा व लेखणी असे बोधचिन्हाचे स्वरूप आहे. दिल्ली येथे दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत साहित्य संमेलन होत आहे. सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रकाश पागे, गुरय्या स्वामी, डॉ. शैलेश पगारिया आदी मंचावर होते.
ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा आहे, असे आपण म्हणत आलो आहोत पण सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकारणाची भाषा अत्यंत खालच्या थराला गेली आहे. अशा परिस्थितीत साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज आहे. साहित्यिकांनी ट्रोल होण्याचा विचार न करता अधिकारवाणीने बोलावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, वैचारिक मोकळेपणा, उदारमतवादी भूमिका घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे बघितले जात आहे. 119 वर्षांच्या कार्यकाळात मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी परिषद कार्यरत असून लेखकांची खंबिरपणे पाठराखण करीत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी परिषदेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी सांगितली.
संजय नहार म्हणाले, परस्पर विरोधी विचारांच्या व्यक्ती साहित्य परिषदेत एकत्र येऊन समाजाची दिशा बदलण्याची क्षमता ठेवत कार्यरत असतात. विरोधकाला शत्रू मानायचे नसते अशी भूमिका घेणाऱ्या साहित्य परिषदेच्या वास्तूमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मराठी अस्मितेचा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी राज ठाकरे हे कायम पुढे असतात. दिल्ली काबिज करायची आजही मराठी माणसात कुवत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
बोधचिन्ह साकारणारे प्रसाद गवळी यांचा तसेच संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, संजय सोनवणी, राजन खान, शिरीष चिटणीस, राजन लाखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना चव्हाण यांनी केले तर आभार लेषपाल जवळगे यांनी मानले.
नाठाळ राजकारण्यांवर साहित्यिकांनी दबाव निर्माण करावा : राज ठाकरे
RELATED ARTICLES
New Delhi
haze
18.1
°
C
18.1
°
18.1
°
59 %
0kmh
0 %
Thu
23
°
Fri
27
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°