चिंचवड : धार्मिक शिस्त आणि मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टने मोठा निर्णय घेतला असून, अष्टविनायक गणपतीसह पाच प्रमुख मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ म्हणजेच ड्रेसकोड लागू केला आहे. हा निर्णय भक्तांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी तसेच मंदिर परिसरातील भक्तीमय वातावरण अबाधित राहावे यासाठी घेण्यात आला आहे.
ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, मोरगावचा श्री मोरेश्वर, थेऊरचा श्री चिंतामणी, सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, चिंचवडचा श्री मोरया गोसावी संजीवनी मंदिर आणि खार नारंगी मंदिर – या पाचही मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही सर्व देवस्थाने चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारित येतात.
ड्रेसकोडचे नियम काय आहेत?
ट्रस्टने स्पष्ट केले आहे की, मंदिरात येणाऱ्या भक्तांनी पारंपरिक, शालीन आणि श्रद्धेच्या वातावरणाशी सुसंगत असा पोशाख परिधान करावा.
- पुरुषांसाठी – शर्ट, टी-शर्टसह पूर्ण लांबीची पँट, किंवा धोतर, कुर्ता-पायजमा यासारखे पारंपरिक पोशाख अपेक्षित आहेत.
- महिलांसाठी – साडी, सलवार-कमीज, पंजाबी ड्रेस किंवा इतर पारंपरिक पोशाख घालावा.
- टाळावयाचे पोशाख – अति आधुनिक, पारदर्शक, फाटके, स्लीव्हलेस, शरीरप्रदर्शन करणारे कपडे मंदिर परिसरात निषिद्ध करण्यात आले आहेत.
ट्रस्टने स्पष्ट केलं आहे की, मंदिर हे केवळ वास्तू नसून श्रद्धा, संस्कृती आणि भक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा, अशी विनंती केली गेली आहे.
मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवनी समाधी मंदिरासह श्री मंगलमूर्ती वाडा या धार्मिक स्थळांवर भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे त्याठिकाणी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
मंदिरात वावरताना भक्तांनी आपली उपस्थिती, वर्तन आणि पोशाख या सर्व गोष्टी मंदिराच्या सन्मानास अनुसरून असाव्यात, यासाठी हा ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे.