पुणे- पुनित बालन ग्रुप तर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथे पर्व ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ४ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होणार असून स्पर्धेत विविध मंडळांचे २४ संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, सार्वजनिक गणपती, नवरात्र मंडळे तसेच ढोल-ताशा पथकांचा समावेश असलेली ही नाविन्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा ठरली आहे. स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेचे हे सलग चौथे पर्व आहे. गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांचे २४ निमंत्रित संघ एकत्रितपणे या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतात आणि हेच या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या वर्षी स्पर्धेमध्ये आठ नवीन संघांना खेळण्याची संधी देण्यात आली असून स्पर्धेमध्ये विजेतेपदासाठी अधिक चुरस दिसणार आहे.
पुण्यातील श्री कसबा गणपती मडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालिम मंडळ, श्री तुळशीबाग गणपती मंडळ या मानाच्या गणपती मंडळांसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळ, होनाजी तरुण मंडळ, जनार्दन पवळे संघ, साई गणेश मंडळ विश्रामबाग मित्र मंडळ हे सहभागी होणार असून महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, सूर्योदय प्रतिष्ठान या नवरात्र मंडळांसोबत युवा वाद्य ,श्रीराम, शिवमुद्रा, नादब्रह्म सर्ववादक,समर्थ, रमणबाग, नादब्रह्म ट्रस्ट, गजर,नुमवी, शिवतेज,आदी वादक पथकांच्या क्रिकेट संघांचा स्पर्धेत समावेश आहे.
या स्पर्धेचे सामने सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर होणार आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या स्पर्धेत २४ संघांपैकी अव्वल ८ संघ बाद फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत.
रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, गुरुजी तालिम टायटन्स्, मंडई मास्टर्स, साई पॉवर हिटर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, कसबा सुपरकिंग्ज्, गरूड स्ट्रायकर्स, तुळशीबाग टस्कर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, शिवमुद्रा ब्लास्टर्स, नादब्रम्ह ड्रमर्स, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक, युवा योद्धाज्, सुर्योदय राईझर्स, जनादर्न जायंट्स, नुमवी स्टॅलियन्स्, भगतसिंग लिजंड्स, विश्रामबाग नाईट्स, समर्थ चॅलेंजर्स, एच.टी.एम. टायगर्स, गजर सुपरनोव्हाज्, रमणबाग फायटर्स असे २४ निमंत्रित संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
विजेत्या संघाला २ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला ५१ हजार रूपये आणि इलेक्ट्रिक बाईक देण्यात येणार आहे. ‘फेअर प्ले’ पुरस्कार जिंकणार्या संघाला २५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. याबरोबरच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार्या खेळाडूला रोख पाच हजार रूपये अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.गतवर्षी (२०२४) साई पॉवर हिटर्स संघाने विजेतेपद तर, शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाने उपविजेतेपद पटकावले होते.