नवी मुंबईत कायदा व नियोजनाला बाधा आणणाऱ्या कोणत्याही बेकायदा बांधकामाला आम्ही अजिबात सहन करणार नाही. नियमांचे पालन सर्वांसाठी समान असून, शहराचा शिस्तबद्ध व सुरक्षित विकास हीच आमची प्राथमिकता आहे.- डॉ. राहुल गेठे,
अतिरिक्त आयुक्त,नवी मुंबई महानगरपालिका
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नियमबाह्य बांधकामे रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून बेलापूर सेक्टर १९ येथील अनधिकृत मदरसा व मशिदीवरील कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांसह नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली. शहरातील बेकायदेशीर निवासी, व्यावसायिक तसेच धार्मिक स्वरूपाच्या बांधकामांवर महापालिकेची सातत्याने नजर असून, अशा प्रकारच्या अतिक्रमणांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

यापूर्वीही बेकायदा उभारण्यात आलेल्या डान्सबार व इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला, शहरी नियोजनाला व कायद्याच्या अंमलबजावणीला प्राधान्य देत अशा मोहिमा नियमितपणे राबविल्या जातील. महानगरपालिकेच्या हद्दीत कोणतेही बांधकाम करताना आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येईल.


