पुणे,- भारतीय जनता पक्षात मिळणारे पद हे केवळ प्रतिष्ठेचे नसून जबाबदारीचे असते. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांनुसार जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतपाटील यांनी केले.भाजप कोथरूड मध्य मंडलाच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, नवनियुक्त मंडल पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण मंडल अध्यक्ष निलेश कोंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, उपाध्यक्ष नितीन शिंदे, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते.ना. चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले, “भाजपात अनेक कार्यकर्ते असे आहेत, ज्यांनी बूथ अध्यक्ष ते केंद्रीय नेतृत्वापर्यंतचा यशस्वी प्रवास केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पद हे जबाबदारी समजून काम करावे.देशाच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी सांगितले की, “गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने झपाट्याने प्रगती केली आहे. आज जवळपास २५ कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली आहे. हे यश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.”
राज्याच्या संदर्भात बोलताना त्यांनी नमूद केले की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य प्रगतीपथावर असून, कालच शेतीसाठी कमी दराने वीज देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.”
मंडल अध्यक्ष निलेश कोंडाळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास आणि चंद्रकांतदादांचा विद्यार्थी परिषदेपासूनचा संघर्ष हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आदर्शावर चालत पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे.”