पिंपरी – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक, पिंपरी-चिंचवड येथील राजन लाखे यांचा माधवराव पटवर्धन सभागृहात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
२६ जानेवारी २०१८ रोजी दिल्ली येथे तत्कालीन आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धरणे आंदोलनात राजन लाखे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष म्हणून सक्रीय सहभाग घेतला होता. या आंदोलनात सातारा, पिंपरी-चिंचवड आणि अन्य भागांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. सातारा येथून विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, डॉ. राजेंद्र माने, वजीर नदाफ, नंदकुमार सावंत आदी सहभागी झाले होते.
या आंदोलनानंतर झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या परिणामी ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला.
या ऐतिहासिक लढ्यातील योगदानाबद्दल शिवेंद्रराजे भोसले – सध्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, यांच्या हस्ते राजन लाखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि सरहद संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
राजन लाखे यांनी त्या काळात पिंपरी-चिंचवडमधून पंतप्रधानांना दहा हजार पत्रे पाठवून जनआंदोलन उभं केलं होतं. त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये परिसंवादांचे आयोजन करून प्राध्यापकांचे अभिप्राय घेतले आणि स्थानिक पातळीवर जागृती केली. या प्रयत्नांमुळे मराठी अभिजाततेसाठी व्यापक चळवळ उभी राहिली.
या सोहळ्याचे प्रास्ताविक संजय नहार यांनी केले तर शैलेश पगारिया यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्लीतील आंदोलनाच्या आठवणींना उजाळा देताना लाखे यांचे योगदान “सामूहिक भाषिक लढ्याचा महत्त्वाचा दुवा” असल्याचे नमूद केले.