शहरात विविध ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता होर्डिंग्स किंवा जाहिरात फलक उभारण्यात येत आहेत. यामुळे शहराचे विदृपीकरण होत असून होर्डिंग कोसळून जिवित किंवा वित्त हानी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर सोमवार पासून कारवाईला सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील होर्डिंग्सबाबत महापालिका अधिकारी, जाहिरात फलक धारक यांच्यासमवेत शुक्रवारी (दि.17) बैठक झाली होती. त्यावेळी दोन दिवसात होर्डिंग काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. पावसाच्या सुरूवातीस येणाऱ्या वादळ, वाऱ्यामुळे कुजलेली, गंजलेली, कमकुवत अशा प्रकारच्या जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जिवीतहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते. शहरातील सर्व जाहिरात फलक धारकांनी आपला परवाना दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. दरवर्षी 31 मार्चपर्यंत विहीत वेळेत फलक धारकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नसेल तर त्यांचा परवान्याचे नूतनीकरण केले जाणार नाही. तसेच प्रत्येक फलक धारकाने संरचनात्मक लेखापरिक्षण प्रमाणपत्र (स्ट्रक्चरल ऑडिट सर्टिफिकेट) सादर करणे बंधनकारक आहे. जे होर्डिंग धारक प्रमाणपत्र सादर करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द केला जाईल. तसेच होर्डिंग उभारण्यात आलेल्या जागेवर संरचना अभियंत्याने पाहणी करूनच संरचनात्मक लेखापरिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे तसेच जाहिरात फलकाची संरचना गंजू नये किंवा कमकूवत होऊ नये यासाठी संरचना पेंटींग करणे बंधनकारक असणार आहे, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या होत्या.
सर्वेक्षणात 24 अनधिकृत होर्डिंग आढळले आहेत. या होर्डिंग धारकांना होर्डिंग हटविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. काहींनी होर्डिंग काढले नसल्याने कारवाई सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सहा प्रभागात 1 हजार 136 होर्डिंग आहेत. यापैकी 918 होर्डिंग्जधारकांनी रितसर परवानगी घेतली आहे. तर 218 जणांनी नवीन आर्थिक वर्षात अद्याप परवानगी घेतली नसल्याची बाब समोर आली आहे.
कोणत्या प्रभागात किती होर्डिंग
प्रभाग संख्या
अ – 256
ब – 378
क – 81
ड – 182
इ – 177
फ – 62
एकूण – 1136