पुणे – देशभर पाणी विषयक वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न निर्माण होत असताना त्यावर शासन स्तरावर तसेच विविध सामाजिक संस्था उपाय शोधून ते अंमलात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात पाणी प्रश्नावर काम व्हायचं असेल तर पाण्याच्या विविध पैलूंबद्दल समाजात साक्षरता निर्माण व्हायला हवी असे प्रतिपादन राज्याचे निवृत्त साखर संचालक तथा यशदा या राज्य सरकारच्या संस्थेचे अतिरिक्त महासंचालक मा.श्री.शेखर गायकवाड यांनी केले. यासाठी लोक साक्षर करणे, पाण्याचा वापर, पाण्याचे प्रदूषण, समन्वयी पाणी वाटप, शाश्वत स्रोत स्थिर कसे राहतील यावर विचार, कारखानदारांकडून होणारा पाण्याचा वापर, गैरवापर आदींवर काम करण्याची गरज आहे या बाबींवर त्यांनी भर दिला आणि सांगली जिल्हाधिकारी, भुजल संचालक व साखर संचालक या पदावर काम करताना पाणी प्रश्नाबाबत आलेले अनुभव सांगितले. मिरज वरून लातुर शहर व परिसराला रेल्वेने पिण्यासाठी पाणी पुरवावे लागणे ही अत्यंत भयावह घटना असून अशा बाबी भविष्यात टाळण्यासाठी पडणारे पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य वापर याबाबत समाज सजग व्हायला हवा यावर त्यांनी बोलताना भर दिला.
महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेच्या वतीन दिला जाणारा जलमित्र पुरस्कार या वर्षी मध्य प्रदेश राज्यातील झाबुआ जिह्यासह आदिवासी भागात जलक्षेत्रात काम करणारे संपर्क समाज सेवी संस्थेचे
संचालक निलेश देसाई यांना जलक्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा समन्यायी पाणी हक्क परिषदेचे अध्यक् व भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष मा.श्री.आनंदराव दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. जलमित्र पुरस्कार सोहळ्याचे हे १२ वे वर्ष असल्याने संस्थेच्या सातत्यपुर्ण कामाबद्दल देखील श्री.गायकवाड यांनी गौरवोदगार काढले.
सन्मारार्थी श्री.निलेश देसाई यांनी बोलताना महाराष्ट्र सांगितले कि पाणी क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात झालेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. यात वॉटर शेड, पाणी पंचायत, पाणी बचत आदींचा समावेश आहे. ज्ञान, संसाधने आणि स्थानिक समाजाचे नेतृत्व यांच्या जोरावर स्थानिक समस्या सोडवता येतील. ग्रामीण विकास आणि विकास कामांच्या योजना या तेव्हाच यशस्वी होतील, जेव्हा लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि लोकसभागातूनच ग्रामीण विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल असे विचार श्री.निलेश देसाई यांनी व्यक्त केले. हे सांगताना त्यांनी गेल्या ३७ वर्षात त्यांनी झाबुआ जिल्ह्यात आदिवासी समाजासोबत केलेल्या कामाचे निष्कर्ष व त्यामधून ऊभा राहिलेले समाजोपयोगी काम यांची सविस्तर माहिती दिली. संपर्क संस्थेच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील ९ जिल्ह्यातील २००० हून अधिक गावात शिक्षण, आरोग्य, जलसंधारण व देशी बीज बॅंक अशा क्षेत्रात काम सुरू असल्याचेही सांगितले. पाणी प्रश्नावर महाराष्ट्र राज्यात झालेल्या कामाचे कौतुक ही देसाई यांनी केले.
यावेळी मा.श्री.आनंदराव दादा पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कुलगुरू नांदेड तथा निवृत्त संचालक उच्च शिक्षण विभाग मा.डॉ.के.एम.कुलकर्णी, निवृत्त सचिव जलसंपदा विभाग मा.श्री.अविनाश सुर्वे, ज्येष्ठ कृषी तज्ञ निवृत्त प्राचार्य मा.डॉ.मुकुंदराव गायकवाड यांनी जलक्षेत्रातील आपले अनुभव सांगून महाराष्ट्र विकास केंद्राच्या कार्यास व जलमित्र सन्मारार्थी मा.श्री.निलेश देसाई यांना शुभेच्छा दिल्या. देशाचे माजी रेल्वे मंत्री मा.डॅा.सुरेश प्रभु यांचा शुभसंदेश देखील वाचण्यात आला.महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले कि संस्था रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्यामुळे येणाऱ्या काळात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत त्यामध्ये पाणी, भूजल, समन्यायी पाणी वाटप यावर जलपरिषद, संवाद सभा घेणार आहे व सहकार, शिक्षण, स्वयंरोजगार या क्षेत्रातही काम करणार आहे. यासाठी सर्व मान्यवर मंडळींनी सहयोग द्यावा असे आवाहन श्री पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात केले.
या कार्यक्रमासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अनुक्रमे मा.श्री.राजेंद्र पवार व मा.श्री.हिरालाल मेंढेगिरी, भुजल वैज्ञानिक मा.श्री.सुरेश खानापुरकर व मा.श्री.उपेंद्र दादा धोंडे, जल अभ्यासक मा.डॅा.सतीश खाडे, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मा.श्री.राजाभाऊ गोलांडे, सोलापूर जि.प.चे माजी सदस्य मा.श्री.झुंझार नाना भांगे, भुजल तज्ञ प्रा.डॅा.साबळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.प्रदीप कदम यांनी व सन्मानपत्र वाचन श्री.राजेंद्र शेलार यांनी केले तर आभार प्रदर्शन अभियंता मित्र या मासिकाचे संपादक डॅा.कमलकांत वडेलकर यांनी केले.