माढा- साताऱ्यातून लाखाच्या मताधिक्याने जिंकू- पवार
कराड -राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लोकसभेच्या माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील आणि साताऱ्यातून शशिकांत शिंदे हे दोन्ही उमेदवार एक लाखाच्या मताधिक्याने जिंकतील असा दावा करताना, खासदार शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘महाविकास आघाडी’चे माढा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ दहिवडीमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील उत्तम जानकर, अनिल देसाई, अभयसिंह जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले की, देशाची लोकशाही वाचविण्यासाठी, नरेंद्र मोदी आणि अमित शहांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी, देशाचे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना घरी बसविण्यासाठी, महागाई वाढवून गोरगरिबांचे कंबरडे मोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सत्ता बदल करावा. माढा आणि साताऱ्याचे आपले उमेदवार हे कर्तबगार, अन्याया विरोधात चिडून उठणारे, जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे उमेदवार मतदारसंघाच्या विकासासाठी रक्ताचे पाणी करणारे असल्याचा विश्वास पवारांनी दिला.