पिंपरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत ५७५ पदांवर युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येणार असून या संधीचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोदणी करावी. तसेच महानगरपालिकेच्यावतीने अर्ज भरण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी सुविधा केंद्र तसेच सेतू सुविधा केंद्र, मोबाईलद्वारे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोंदणीकृत १२ वी, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीधारण करणाऱ्या सुमारे ५७५ युवकांना महापालिकेच्या विविध विभागात कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच वय किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे. तो १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे आधार संलग्न बॅंक खाते असावे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा सहा महिन्याचा राहणार असून उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह ६ हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारकांना ८ हजार रुपये, पदवीधर उमेदवारांना १० हजार रुपये विद्यावेतन शासनामार्फत थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
शेखर सिंह, आयुक्त: आपले शिक्षण पूर्ण करुन युवक नोकरी, व्यवसायाच्या शोधात असतात. युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. युवकांना प्रत्यक्ष कार्याचा अनुभव देऊन त्यांच्यात रोजगाराबाबत सर्व क्षमता निर्माण करण्यासाठी महापालिका ही योजना प्रभावीपणे राबविणार आहे.
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त: महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या एकूण पदांच्या ५ टक्के पदे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’अंतर्गत तात्पुरत्या कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. त्यानुसार विविध विभागांच्या मागणीनुसार एकूण ५७५ जागा भरण्यात येणार आहेत.