पिंपरी- महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याबाबत विविध सूचना केल्या. यावेळी उपआयुक्त तथा लोकशाही दिन उपक्रम समन्वय अधिकारी राजेश आगळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, प्रशासन अधिकारी श्रद्धा बोरडे, कार्यकारी अभियंता एस. टी. जावरानी, किरण अंदुरे, सन्मान भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
झालेल्या लोकशाही दिन उपक्रमात एकूण ६ तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या. त्यामध्ये अरूंद रस्ते रुंद करण्यात यावेत, काळेवाडी येथील तापकीर मळा चौक, राजवाडे नगर या भागातील रस्त्यांचा विकास करावा, पाण्याच्या टाकीतील पाण्याचा पाणीटंचाई असलेल्या भागात पाणीपुरवठा करावा, काळेवाडी पोलीस चौकीसमोरील महापालिका दवाखान्याचे प्रशस्त जागेत स्थलांतर करावे, लहान व्यासाच्या ड्रेनेज लाईन्स बदलून सिमेंट किंवा काँक्रीटच्या मोठ्या ड्रेनेज लाईन्स टाकाव्यात या सूचनांचा समावेश होता.
लोकशाही दिनासाठी अर्ज स्विकृतीचे निकष
लोकशाही दिनासाठी दाखल करावयाच्या अर्जाच्या विहित नमुन्यातील प्रती नागरिकांना सहजतेने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज करताना यामध्ये नमूद तक्रारीवजा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असेल. हा अर्ज अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे असावा. नागरी सुविधा केंद्रांचे विभागप्रमुख तथा समन्वय अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यातील अर्ज अर्जदाराने १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठवणे आवश्यक राहील. लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाही.
लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपली तक्रार विहित नमुन्यातील अर्जाद्वारे महानगरपालिकेकडे पाठवावी. हे अर्ज नागरी सुविधा केंद्रांमध्ये विनामूल्य उपलब्ध असून, त्यांची पूर्तता करून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी सादर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या परिसराच्या विकासासाठी सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या समस्या व सूचना मांडून या लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घ्यावा. प्रशासन आपल्या प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल घेईल आणि त्यावर आवश्यक उपाययोजना केल्या जातील.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त (२), पिंपरी चिंचवड महानगरपालिका