पुणे-पुण्यात सत्र न्यायालयासमोर गोंधळ पाहायला मिळाला आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला न्यायालयाकडे आणले जात असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. वंदे मातरम संघटनेने हे काम केलं आहे.त्यामुळे सत्र न्यायालयाबाहेर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. पण, पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखलं आहे. वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांनी शाई फेक करण्याचा प्रयत्न केला आहे.
वंदे मातरम संघटना या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. विशाल अग्रवाल याला सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला पोलिसांच्या गाडीतून आणलं जात होतं. यावेळीच त्याठिकाणी वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते आले. त्यांनी विशाल अग्रवाल याच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखले. अग्रवाल यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
वंदे मातरम संघटनेने मागणी केलीये की, ‘आरोपी विशाल अग्रवाल याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा. त्याच्यावर याआधीच काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मुलापेक्षा जास्त विशाल अग्रवाल दोषी आहे. त्याने मुलाला गाडी चालवण्यास का दिली? त्याने दारु प्यायली तर त्याने ऑटो किंवा इतर गाडीने येण्यापेक्षा गाडी का चालवली. याप्रकरणात कठोर कारवाई केली जावी.
पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही शोभणारी गोष्ट नाही. त्यामुळेच आम्हाला त्याच्या तोंडावर काळे फासायचे होते. आम्ही काही प्रमाणात त्याच्यावर शाई फेकण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळे आम्ही जे करण्यासाठी आलो होते ते आम्ही केलं आहे. पण, याप्रकरणी त्या शोरुम मालकाविरोधातही गुन्हा दाखल करा. जोपर्यंत याप्रकरणी त्या दोन निष्पाप लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल, असं वंते मातरम संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगे म्हणाले.
सचिन जामगे म्हणाले की त्या अल्पवयीन मुलावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही शाई फेक आंदोलन केले आहे. त्या मुलाचे वडील विशाल अगरवाल याने जर आपल्या मुलाला गाडी दिली नसती तर दोन निष्पाप बळी गेले नसते.पण त्याने गाडी दिल्याने त्याच्या मुलाने दोन निष्पाप मुलांचं जीव घेतलं आहे. अशी या पिता पुत्रावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.