पुणे: “जीवनामध्ये संगतीला अत्यंत महत्त्व आहे. संगतीमुळेच जीवनाला आकार येतो. वैष्णव संगती असलेल्या माणसाला सुख लाभते. या सृष्टीवर परमार्थ सोडून कुठलीही गोष्ट सुखाची नाही. सुखासाठी कलियुगामध्ये निर्विकार व्हावे लागते. अशा वेळेस वारकऱ्यांसाठी वारी ही संजीवनीची बुटी आहे. ”असे विचार ह.भ.प.श्री. धर्मराज महाराज हांडे यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीच्या लोकशिक्षणपर अभिनव उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ.संजय उपाध्ये, गिरीश दाते, नारायण महाराज मारणे, डाॅ. टी.एन. मोरे व ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर उपस्थित होते.
ह.भ.प.श्री. धर्मराज महाराज हांडे म्हणाले,“जीवनात प्रगती करायची असेल तर संकटाचा सामना करावाच लागतो. त्याशिवाय प्रगती साध्य होत नाही. कलियुगामध्ये बरेच व्याधीग्रस्त आहेत, परंतु वारीही त्यांच्यासाठी संजीवनी बुटी आहे. त्यामुळे इथे लाज वाटू देऊ नका. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये श्रवणभक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे, याचे भान सदैव ठेवावे. डॉ. विश्वनाथ कराड, यांनी विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती नांदेल. असे ज्ञान जगासमोर मांडले. त्याचप्रमाणे संतश्री ज्ञानेश्वर व संतश्री तुकाराम महाराजांचे नाव आज संपूर्ण जगात पोचविले.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ त्यागमूर्ती प्रयागअक्कांच्या आशिर्वादामुळे येथे घाटांची उभारणी झाली. ज्ञान, भक्ती आणि कर्म ही परंपरा वारकरी सांप्रदायाची आहे. सद्गुणांची पूजा हीच खरी ईश्वर पूजा हे व्रत घेऊन मी आतापर्यंत कार्य केले आहे. मी हे निमित्तमात्र असून आजही माऊली माझ्याकडून कार्य करून घेत आहे. आळंदी-देहूचे स्वरूप जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात वारकरी सांप्रदायच जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ भक्ताला स्वतःचे असे मत नसते. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेल्या वचनावर चालून भक्ताने आपली आध्यात्मिक उन्नती साधावी. आळंदीच्या या घाटावर वारकऱ्यांनी सुवर्णपिंपळाचे पान आयुष्यभर मनात जपावे.”
प्रा.स्वाती कराड-चाटे म्हणाल्या,“शिक्षणामुळे भविष्यातील पिढी तयार होते. परंतु शिक्षणाला अध्यात्माची जोड दिल्यास व्यक्ती चारित्र्यसंपन्न बनतो. हे सूत्र लक्षात ठेवून डॉ. कराड यांनी विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून नवे शिक्षणाचे दालन उभारले. तसेच, त्यांनी आळंदीत घाटाची निर्मिती, शाळा कॉलेज उभारलेत.” विष्णू भिसे यांनी आपले विचार व्यक्त केले.यानंतर जालना येथील ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांचे कीर्तन झाले. तसेच श्रृती पाटील आणि सहकारी यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम झाला. त्यानंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.प्रस्तावना डॉ सुदाम महाराज पानेगावकर यांनी मांडली. शालिकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.