पुणे: एनव्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी ,सकाळी 11 वाजता, फिरोदिया सभागृह, भांडारकर प्राच्यविद्या संस्था, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे केले जाणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश कदम (अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ),राजेंद्र मिरजे (उपाध्यक्ष,विश्वेश्वर सहकारी बँक.लि,पुणे) यांच्या सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती क्लबचे अध्यक्ष आमोद घमंडे, सचिव गणेश शिरोडे आणि खजिनदार सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एनव्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा ‘पर्यावरण जीवनगौरव’, ‘पर्यावरण भूषण’ आणि ‘पर्यावरण गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाचे 17 वे वर्ष आहे.
यावर्षी कोल्हापूर,शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि तालुक्यातील क्षारपड जमिनीला सुपीक बनविण्यासाठी अथक प्रयत्न करणारे आप्पासाहेब उर्फ गणपतराव पाटील (दादा) ‘पर्यावरण जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

यावर्षीचा ‘पर्यावरण भूषण’ पुरस्कार पद्मश्री प्रा. डॉ. जी डी यादव यांना देण्यात येणार आहे. डॉ. यादव यांनी हरित हायड्रोजन, परिपत्र अर्थव्यवस्था, कार्बन डाय-ऑक्साइड मूल्यांकन या विषयांवर मोलाचे मूलभूत संशोधन केले आहे. त्याचप्रमाणे नेट निगेटिव्ह एनर्जी ट्रान्झिशन आणि शाश्वत विकास यासाठी त्यांनी केलेले काम अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे.
पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे ‘पर्यावरण जीवनगौरव’ आणि ‘पर्यावरण भूषण’ पुरस्कारांचे स्वरूप आहे.
‘पर्यावरण गौरव’ पुरस्कारार्थीमध्ये स्वतः भूलतज्ञ असून देखील सियाचीन आणि चंद्रपूर येथे घरांच्या उभारणीत टाकाऊ प्लास्टिकचा वापर करण्यासाठी पुढाकार घेणारे डॉ. बालमुकुंद पालीवाल, पर्यावरण प्रकल्पांना सीएसआर अंतर्गत निधी प्रदान करून प्रोत्साहन देणारे राजेश जैन, जैविक खत प्रकल्प तज्ञ आणि पर्यावरण प्रयोगशाळेचे प्रवर्तक प्रसाद घळसासी, पर्यावरण शिक्षक प्रदीपसिंग पाटील, पूर्णम इकोव्हि जन फाउंडेशनचे डॉ. राजेश मणेरीकर, इको फॅक्टरी फाउंडेशनचे आदी आनंद चोरडिया, पाणी व्यवस्थापन प्रकल्प तज्ञ वास्तुविशारद ज्योती पानसे, रंकाळा परिसराच्या स्वच्छतेसाठी कार्य करणारे अमर जाधव, इको प्रेरणा फाउंडेशनचे ऋषिकेश कुलकर्णी, विलो इंडिया मॅथर एंड प्लांट आणि किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी यांचा समावेश आहे. मानपत्र,उपरणे आणि स्मृतिचिन्ह असे पर्यावरण गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.