मुंबई : राज्यात येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येणार असून या उपक्रमात ७५ गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून विकसित केली जाणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेलार म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू होणाऱ्या या सेवा पंधरवड्यात माहिती तंत्रज्ञान विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाने @75 ही संकल्पना घेऊन लोकाभिमुख उपक्रम राबवावेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, वायफाय यांचा वापर करून निवडक ७५ गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून उभी करावीत.”
सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा मेळावा
या कालावधीत फिल्मसिटीमध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान, कलाकार व दिव्यांग कलावंतांशी संवाद, आरोग्य उपक्रम, वृक्षारोपण आदी कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुस्तक प्रकाशन, प्रदर्शन, चित्र, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, कला स्पर्धा, तमाशा कलावंतांशी चर्चा, तसेच वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
“आज अनेक पारंपरिक वाद्ये लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. ती जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रदर्शने भरवावीत,” असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
वारसा ठिकाणांची स्वच्छता मोहीम
राज्यातील ११ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकन प्राप्त झाले आहे. या गडकिल्ल्यांचे Virtual Reality व Augmented Reality स्वरूपात सादरीकरण करण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय राज्यातील ७५ वारसा स्थळांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.