पुणे : पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. हा पुरस्कार दरवर्षी १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दिला जातो. लोकमान्य टिळक ट्रस्टने १९८३ पासून या पुरस्काराची सुरुवात केली असून, राष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान दिला जातो. पुरस्कारात एक लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह यांचा समावेश असतो.
या वर्षीचा पुरस्कार वितरण समारंभ १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा देशातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी एक मानला जातो आणि यंदा नितीन गडकरी यांच्या नावावर हा सन्मान जाहीर झाल्याने पुण्यात उत्सुकता आहे.
१९९५ ते १९९९ पर्यंत गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून काम पाहिले आणि या विभागाची फेररचना केली. त्यांनी खासगी गुंतवणूकदार, कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक आणि विविध व्यापारी संघटनांमधील अनेक बैठकांना मार्गदर्शन करीत मोठ्या निधीची आवश्यकता असलेल्या जनहिताच्या प्रकल्पांना खासगी-सार्वजनिक भागीदारीतून गती दिली. त्यांच्या पुढाकाराने रस्त्यांमुळे मेळघाटात दळणवळण वाढले आणि त्याचा परिणाम तेथील कुपोषण घटण्यात आणि स्थानिक लोकांचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचाविण्यात झाला. त्यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत रस्ते जोडणी पोहोचली, स्वातंत्र्यापासून रस्त्याअभावी संपर्क नसलेल्या हजारो दुर्गम गावांना रस्त्यांनी जोडण्यात आले. मुंबईतील उड्डाणपुलांचे बांधकाम ही गडकरी यांची महत्त्वाची कामगिरी मानली जातेे. उड्डाणपुलांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. मे २०१४ मध्ये गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री झाले. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळात त्यांच्याकडे पुन्हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. गडकरी यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेेले रस्ते राष्ट्र उभारणी व दळणवळणासाठी मोलाचे योगदान देणारे ठरले आहेत. गडकरी यांच्या नेतृत्त्वात झोजीला हा भारतातील आणि संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा निर्माण करण्याचे काम झाले. लडाखमध्ये कारगील जिल्ह्यातील सोनमर्ग आणि द्रास दरम्यान झोजीला येथे १४.२ किलो मीटरचा हा बोगदा निर्माण करण्यात आला आहे. यामुळे भारतीय सैन्य दलास सीमा भागात तातडीने पोहचणे सुलभ झाले आहे. नागरी प्रवासासाठी आणि सीमावर्ती भाग जोडण्यासाठी हा प्रकल्प महत्वकांक्षी ठरला आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ही नितीन गडकरी यांच्या कर्तृत्वाला मानवंदना होय!
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप आहे. १९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिल्या वर्षी एस.एम. जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला, सुधा मूर्ती यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.