पिंपरी, – : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता मालमत्ता कर बिलांचे वितरण महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू केले आहे. बिल वाटपासाठी येणाऱ्या महिलांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
महापालिकेच्या हद्दीत सध्या ६ लाख १५ हजार ८६३ नोंदणीकृत मालमत्ता असून, सर्व मालमत्तांकरिता कर बिलांची छपाई पूर्ण करण्यात आली आहे. या बिलांचे वितरण महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून घरोघरी करण्यात येत आहे. या महिलांना महापालिकेच्यावतीने ओळखपत्रे प्रदान करण्यात आली आहेत. येत्या ३१ मे २०२५ पर्यंत सर्व बिलांचे वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, बिल वाटपासाठी येणाऱ्या महिलांना ओळखून त्यांना सहकार्य करावे आणि आपली कराची देयक माहिती वेळेवर तपासून घेणे गरजेचे आहे.
मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता मालमत्ता कर बिले www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. करदाते त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची बिले पाहू व ऑनलाइन भरू शकतात.
विशेषतः, ३० जून २०२५ पर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना कराच्या मूळ रकमेवर १० टक्के सवलत मिळणार आहे.
“महिला बचत गटांमार्फत मालमत्ता कर बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. यामुळे महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळेल आणि नागरिकांपर्यंत वेळेवर बिले पोहोचवण्याच्या उद्दिष्टात मदत होईल. नागरिकांनी महिलांना पूर्ण सहकार्य करावे.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
“महानगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटांच्या माध्यमातून बिल वाटप सुरू आहे. ३० जूनपर्यंत कर भरल्यास विविध सवलतींचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे सर्व मालमत्ताधारकांनी वेळेवर कर भरून सवलतीचा फायदा घ्यावा.”
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका