पुणे: भारतासह एकंदर जगातील शिक्षणाचे महत्व आणि परिभाषा बदल आहे. सध्याचे शिक्षण हे विद्यार्थ्यांना कौशल्ये प्रदान करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देते. त्यामुळे, एकंदरशिक्षणाचे भवितव्य हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेणाऱ्या अध्यापनशैलीत दडलेले आहे,” असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. राजेश एस. यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे आणि इंटरनॅशनल सोसायटी फॉर एज्युकेशनल लीडरशिप (आयएलईएल) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट, लंडन यांच्या सहकार्याने आयोजित ‘ईएलटी समिट २०२५’ या दोन दिवसीय आभासी आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष मा. प्रा. डॉ. मंगेश कराड आणि आयएलईएलचे अध्यक्ष डॉ. कृष्णमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिखर परिषदेस शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञांची उपस्थिती लाभली. यावेळी परिषद अध्यक्ष डॉ. तरुण पटेल, संयोजक डॉ. अतुल पाटील यांच्यासह डॉ. क्रिस्टिन हॅन्सन (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले, अमेरिका), डॉ. हुआहुई झाओ (युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, यूके), एरिक एच. रोथ, सारा डाविला, डॉ. इल्का कोस्ट्का, रिचर्ड जोन्स (यूएसए) यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ वक्त्यांनी सहभाग घेतला. यासह, शैक्षणिक प्रकाशन क्षेत्रातील इयान काउले, प्रा. जोआना स्जोक, आणि जोशुआ ग्नानक्कन (केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट) हेही या परिषदेचे विशेष आकर्षण ठरले.
“Linguistics and Poetics as an Antidote to the Virtual” या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान देताना डॉ. हॅन्सन यांनी साहित्याच्या संवेदनशीलतेचे आणि मानवी मूल्यांचे तंत्रज्ञान युगातील महत्त्व अधोरेखित केले. तसेच, डॉ. झेड. एन. पाटील, माजी अध्यक्ष, ईटीटीएआय पुणे यांना ईएलटी क्षेत्रातील दीर्घकालीन कार्यासाठी ‘आयएसईएल लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने गौरविण्यात आले.
या समिटमध्ये भारत, अमेरिका, कॅनडा, बांगलादेश, भूतान, फिलीपिन्स व ऑस्ट्रेलिया या देशांमधून आलेल्या १२१ हून अधिक शोधनिबंधांपैकी ८० शोधनिबंध सादरीकरणासाठी निवडण्यात आले होते. एआयचा ब्लेंडेड आणि हायब्रिड क्लासरूममध्ये वापर, चॅटजीपीटी पलिकडील एआय अनुप्रयोग, बहुभाषिक संदर्भात एआयचा उपयोग, आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.
समारोप समारंभात मॉडर्न कॉलेज ऑफ बिझनेस अँड सायन्स, मस्कत (ओमान) येथील डॉ. आरती मुजुमदार आणि प्रा. पाटील यांनी एआय आणि भाषा अध्यापनातील समकालीन बदल व आव्हानांवर भाष्य केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अशोक घुगे आणि प्रा. अमिषा जयकर यांनी केले, तर समारोप सत्राचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर आणि डॉ. स्वप्नील शिरसाठ यांनी केले