पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिप (PIMSE) मध्ये नुकत्याच प्रवेश घेतलेल्या एमबीए विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या इंडक्शन कार्यक्रमाला पद्मश्री सुश्री लीला पूनावाला या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यशस्वी उद्योजिका, समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवलेल्या पूनावाला यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवासाचे अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले. मेहनत, प्रामाणिकपणा व सामाजिक जबाबदारी या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हाने स्वीकारण्याचे, वैयक्तिक व व्यावसायिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

“यश म्हणजे केवळ उद्दिष्टे गाठणे नाही, तर किती लोकांच्या जीवनाला स्पर्श करून त्यांना उन्नतीच्या वाटेवर नेले हे महत्त्वाचे आहे,” असे पूनावाला यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संचालिका डॉ. पोरीनीता बनर्जी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. संस्थेची दृष्टी, संस्कृती आणि शैक्षणिक वातावरण यांची ओळख करून देणाऱ्या सत्रांबरोबरच माजी विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग व ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी नवीन बॅचचे मन:पूर्वक स्वागत केले.
या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी नवी ऊर्जा आणि दिशा मिळाल्याचे वातावरणात जाणवले.


