28.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeताज्या बातम्यासर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे25: निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत आणि नवीन ४३ आपला दवाखान्यांच्या माध्यमातून नव्याने भर पडणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, सक्षम आणि गतिमान होईल, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल. अशा घटना पुन्हा घडू नये, अशी प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य शासन एक नवे धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे. या धोरणानुसार कोणतेही रुग्णालय नागरिकाला अत्यावश्यक आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणार नाही. गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका असून लवकरच राज्यात रुग्णालयांसाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू करणार आहे. राज्य शासन रुग्णालयांना जागेसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देते.

जागतिक हिवताप दिनानिमित्त चांगले काम करण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन श्री. पवार म्हणाले, अधिकारी, कर्मचाऱ्यासह नागरिकांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे. आपले मानसिक आरोग्य चांगले राखून निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया आहे या विचाराने सर्वांनी काम करावे, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली पाहिजे. असेही श्री. पवार म्हणाले.

आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले, आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुणे हे राज्यातील दुसरे सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्यात आरोग्य विभागाची अनेक राज्यस्तरीय कार्यालये आहेत. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमुळे आरोग्य विभागाची एकाच छताखाली येणार आहेत. यामुळे आरोग्य विभागाची सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा देण्यास मदत होणार आहे.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या इमारतीमध्ये प्रशिक्षण हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल, अभिलेख कक्ष, वाहनतळ, आदी पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे, या इमारतीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या नवीन आपला दवाखान्यांपैकी पुणे शहरात सात दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून शहरी भागात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब नागरिकांना अधिक गतिमान आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे श्री. आबिटकर म्हणाले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य विभागाचे काम समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातही आपल्या सेवा पुरविल्या आहेत. या पुढील काळातही आरोग्य विभाग चांगली कामगिरी करून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमानंतर जागतिक हिवताप दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर त्यात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगा नायक यांनी केले.

यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र आणि रेण्वीय निदान प्रयोगशाळा सुरु करण्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयांमध्ये स्वच्छता, आहार आणि रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांची स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे राज्यातील ८ परिमंडळातील ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यामध्ये साथरोग उद्रेक काळात जीवाणू व विषाणू चाचणी जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे रेण्वीय निदान प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
78 %
4.6kmh
97 %
Mon
29 °
Tue
34 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!