पुणे : शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पुणे शहर पोलिस आयुक्तालयात मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे. याअंतर्गत दोन नवीन परिमंडळे आणि पाच नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पोलिस प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना करून दोन नवीन परिमंडळे निर्माण करण्याबाबत तसेच त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व होणाऱ्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला १३ ऑक्टोबर रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली. त्यानंतर राज्य सरकारने याबाबत अंतिम निर्णय घेतला आहे.
या शासन निर्णयानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या पाच परिमंडळांची पुनर्रचना करून आणखी दोन नवीन परिमंडळांची निर्मिती करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाची नवीन परिमंडळीय रचना ही नव्याने तयार होणाऱ्या पोलिस ठाण्यांच्या आधारे निश्चित केली जाणार आहे.
पाच नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती
शहराचा वाढता भौगोलिक विस्तार आणि पोलिसांवरील कामाचा ताण लक्षात घेता पाच नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यासही राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार पुढील पोलिस ठाणी कार्यान्वित होणार आहेत :
१) नऱ्हे पोलिस ठाणे
२) लक्ष्मीनगर पोलिस ठाणे
३) मांजरी पोलिस ठाणे
४) लोहगाव पोलिस ठाणे
५) येवलेवाडी पोलिस ठाणे
ही सर्व पोलिस ठाणी सध्या अस्तित्वात असलेल्या पोलिस ठाण्यांच्या विभाजनातून तयार केली जाणार आहेत. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यातून नऱ्हे, येरवडा पोलिस ठाण्यातून लक्ष्मीनगर, हडपसर पोलिस ठाण्यातून मांजरी, विमानतळ पोलिस ठाण्यातून लोहगाव, तर कोंढवा व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यांतून येवलेवाडी पोलिस ठाणे कार्यान्वित होणार आहे.
८३० नवीन पदांची निर्मिती
प्रत्येक नवीन पोलिस ठाण्यासाठी १६६ पदांची मंजुरी देण्यात आली असून, एकूण ८३० पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे पोलिस दलाचे सक्षमीकरण होऊन गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळेल, नागरिकांना तातडीची सेवा उपलब्ध होईल आणि पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.


