पंढरपूर, – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तासन्तास रांगेत ताटकळावे लागणाऱ्या त्रासावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. वारकरी संप्रदायाच्या मागणीला प्रतिसाद देत मंदिर समितीने ८० तुळशीपूजा तात्पुरत्या बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाविकांना ६ ते ७ तास रांगेत उभे राहावे लागत होते. यामुळे नाराजी आणि घोषणाबाजीचा सूर वाढला होता. वारकरी पाईक संघटना, तसेच भाविकांच्या तक्रारींनंतर मंदिर समितीने तातडीने निर्णय घेत, रविवारपासून फक्त १० तुळशीपूजा सुरू ठेवण्याचे जाहीर केले. गर्दी वाढल्यास या उर्वरित पूजाही तात्पुरत्या बंद करण्यात येतील, अशी माहिती समितीने दिली.
दररोज ९० तुळशीपूजा होत असताना, आता केवळ १० पूजा सुरू राहणार आहेत. यामुळे भाविकांना जास्त वेळ ताटकळावे लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वारकरी संप्रदायाने या निर्णयाचे स्वागत केले असून, भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यापुढे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जलद, सुलभ आणि आनंददायी अनुभव मिळावा, यासाठी प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह ठरले आहे.