पुरुषप्रधान मानसिकतेला बाल्यावस्थेपासून दूर ठेवायला हवे
- शबाना आझमी यांचे प्रतिपादन; ग्रॅव्हिट्स फाउंडेशन, युनिसेफतर्फे ‘बाल्यावस्थापूर्व संगोपन’वर गोलमेज परिषद
पुणे: “आपल्या भारतीय समाजमनात पुरुषप्रधान मानसिकता असून, स्त्रियांच्या संदर्भातील असमानता आजही टिकून आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील पिढीचे प्रतिनिधी असणारी बालकांची पिढी घडवायची असेल, तर समाजमनातील पुरुषप्रधान मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनी केले. बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा ग्रॅव्हिट्स फाउंडेशन, युनिसेफचा पुढाकार स्तुत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रॅव्हिट्स फाउंडेशन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल्यावस्थापूर्व संगोपन (अर्ली चाईल्डहूड डेव्हलपमेंट)’ या विषयावरील गोलमेज परिषदेत शबाना आझमी बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मॅरियटमध्ये झालेल्या या परिषदेवेळी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे, युनिसेफ महाराष्ट्रचे प्रमुख संजय सिंग, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग, डॉ. अमिता फडणीस, बाल्यावस्थेतील संगोपन अभ्यासक डॉ. सिमीन इराणी, अभिनेत्री तनिषा मुखर्जी, लाईफ कोच प्रीती बानी, युनिसेफ महाराष्ट्रच्या संवादक स्वाती महापात्रा, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदींनी आपले विचार मांडले.
शबाना आझमी म्हणाल्या, “आपल्या समाजातील पारंपरिक समज, गैरसमज, स्त्री-पुरुषांमधील कमालीची असमानता, स्वातंत्र्याचा अभाव, मोकळेपणा नसणे आणि सतत लादले जाणारे मातृत्व यामुळे पुरुषसत्ताक मानसिकतेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसतो. आपले चित्रपट, मालिकाही या पुरुषप्रधान मानसिकतेला खतपाणी घालणारे असतात. परिणामी जन्माला येणाऱ्या बाळामध्ये लिंगभेद, कुपोषण, व्याधीग्रस्तता, मुलगा आणि मुलगी यांच्या पालनपोषणात फरक करण्याची वृत्ती दिसून येते. बालकांची नैसर्गिक वाढ आणि योग्य पालनपोषण यांचा मेळ घालण्यात यश मिळत नसल्याने मुलांच्या भवितव्यावरही परिणाम घडतात. मुले छोट्या आनंदालाही मुकतात. शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे समाजात समानतेचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.”
सूरज मांढरे यांनी शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना विशेषतः ग्रामीण भागातील बालकांचे व स्त्रियांचे वास्तव मांडले. छोट्या कृती, संवाद, वाक्ये यातूनही बालकांच्या बाबतीत मुलगा – मुलगी असे भेद केले जातात. बालकांची मानसिकता निरीक्षणातून शिकण्याची असते. आसपासच्या व्यक्ती जे बोलतात आणि आचरण करतात, त्यावरून अगदी बालवयापासूनच पुरुष शक्तीमान, सामर्थ्यवान आणि स्त्री नाजुक, असे समीकरण बालकांच्या मनात रुजते. त्यामुळे पालक, कुटुंबीय यांची जबाबदारी अधिक महत्वाची असल्याचे मांढरे यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून देशभरात बालकांच्या आरोग्य तसेच गरोदर मातांच्या संदर्भातील शासकीय स्तरावरील योजनांची आवश्यकता स्पष्ट केली. बालकांसाठी पोषक आहार योजना, मध्यान्ह भोजन यासारख्या योजना व्यापक स्तरावर राबविल्या जात आहेत. ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या मागास बालकांना त्याचा मोठा फायदा होत आहे. मात्र, बालकांच्या आरोग्याबाबत अद्यापही जनजागृतीची गरज आहे, असे कुलकर्णी म्हणाल्या.
स्वागतपर प्रास्ताविक करताना उषा काकडे यांनी गोलमेज परिषदेच्या आयोजनामागील संकल्पना स्पष्ट केली. सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यांचा अनुभव घेत असताना यूनिसेफसारख्या मान्यवर संस्थेसोबत महिला आणि बालकांच्या आरोग्यासंदर्भात एकत्रित प्रकल्पांवर काम करता आले. सुरवातीला ग्रामीण भागातील शाळांमधून आम्हाला अपेक्षित प्रतिसाद नव्हता, पण चिकाटीने प्रयत्न करून आम्ही हा विषय अधिकाधिक शाळा, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांपर्यंत पोहोचवला. आज राज्यातील १०९५ शाळांतील सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही फाऊंडेशनच्या ‘गुड टच बॅड टच’ प्रकल्पाला घेऊन जाण्यात यशस्वी झालो आहोत. बालसुरक्षेची जाणीव वाढवणे, मुलांना असुरक्षित स्पर्श ओळखण्याची आणि तक्रार करण्याची ताकद देणे या उपक्रमासाठी महत्त्वाचे आहे, असे काकडे यांनी सांगितले.
संजय सिंह म्हणाले, “प्रत्येक बालकाला स्वतंत्र व्यक्ती म्हणून मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत, हे यूनिसेफचे मुख्य तत्त्व आहे. समाज म्हणून पाच मुख्य मुद्द्यांवर यूनिसेफ भर देते. बालकांचे आरोग्य, योग्य पालनपोषण, जबाबदार आणि प्रतिसादात्मक पालकत्व, समान दर्जा आणि सुरक्षा, ही पंचसूत्री आहे. ही पाच तत्त्वे हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. तो मिळवून देण्यासाठी यूनिसेफ कटिबद्ध आहे. प्रत्येक मुलासाठी युनिसेफ त्यांच्या पार्श्वभूमीला न बघता, त्यांना केवळ जगण्याचीच नव्हे, तर फुलण्याची समान संधी मिळावी याची खात्री देतो. पहिले एक हजार दिवस आजीवन आरोग्य आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, पण जर हे गमावले तर, त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी किशोरवयीन विकासात गुंतवणूक करणे आवश्यक आहे.”
डॉ. सिमन इराणी यांनी पारदर्शिकांच्या साह्याने बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते बालक ६ वर्षांचे होईपर्यंतच्या कालखंडाचे दर्शन घडवले. प्रसूतीपूर्व अवस्थेतील मातेची काळजी, कुटुंबियांचे साह्य, पित्याची कर्तव्ये, आरोग्यविषयक दक्षता आणि सातत्याने वैद्यकीय मार्गदर्शन, हे कळीचे मुद्दे असल्याचे त्या म्हणाल्या.
डॉ. प्रमोद जोग यांनी कोरोनापूर्व आणि कोरोनानंतरच्या परिस्थितीचे विश्लेषण बालआरोग्याच्या संदर्भात मांडले. बालकांच्या विकास प्रक्रियेवर कोरोना काळाचा मोठा परिणाम झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. लसीकरणाचे विविध परिणाम बालकांवर झाले असून चंचलता, स्वमग्नता यांचे प्रमाण वाढल्याचे ते म्हणाले.
डॉ. अमिता फडणीस, प्रीती बानी, स्वाती महापात्रा यांनीही मनोगत मांडले. लीना सलढाणा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अरुण खोरे यांनी आभार मानले.
‘हेलिकॉप्टर पालकत्व’ भल्याचे आहे का? : आझमी
शबाना आझमी म्हणाल्या, मला वाटते की, आजच्या आईबाबांना त्यांच्या भूमिकेबद्दल जास्तच जागरूकता आहे, जे कदाचित नेहमीच चांगले नसते. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये याची फारशी चिंता नव्हती, तरीही मुलांबरोबर एक खोल, नैसर्गिक प्रेमाचे नाते होते. तुमच्या बाळाशी प्रेम आणि आदराने वागणे अत्यावश्यक आहे. आधुनिक ‘हेलिकॉप्टर पालकत्व’ शैली बालकाच्या भल्यासाठी आहे का? याचा विचार केला पाहिजे. माझ्या पतीने लहानपणीच आईला गमावले होते. खेळणी नव्हती, परंतु त्याला अन्वेषण करण्याचे आणि त्याची कल्पकता विकसित करण्याचे स्वातंत्र्य होते, जे त्याच्या यशाचे श्रेय तो आज एक लेखक म्हणून देतो.”