नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले होते. वयाच्या ९२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री त्यांचे पार्थिव दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
काँग्रेस मुख्यालयात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. माजी पंतप्रधानांच्या निधनावर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. त्यांची एक मुलगी परदेशात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या आगमनानंतरच डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मनमोहन सिंग यांच्या योगदानाची लोकांना आठवण येत आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी काळी पट्टी बांधली होती. मनमोहन सिंग यांना आठवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.
तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही माजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.