कोल्हापूर- काँग्रेसचे वरिष्ठ नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधी येत्या शुक्रवारी व शनिवारी (४ व ५ ऑक्टोबर) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावडा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनालाही राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राहुल गांधी यांचा ४ आणि ५ ऑक्टोबर असा दोन दिवसांचा दौरा असणार आहे. या दौऱ्यावर कोल्हापुरात त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दिली.
यावेळी राज्यातील मोठे नेते कोल्हापुरात असल्याने काँग्रेसमध्ये इनकमिंग होणार का? या प्रश्नावर ‘काँग्रेस ऑलरेडी हाउसफुल आहे, मात्र येणाऱ्यांचे स्वागतच असेल’ असा सूचक संदेश सतेज पाटील यांनी दिला. राहुल गांधी यांच्याहस्ते शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार आहेत. त्यादिवशी राहुल गांधी यांचा कोल्हापुरात मुक्काम असणार आहे. दुसऱ्या दिवशी ५ ऑक्टोबरला सायंकाळी कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर २००१ कलाकार नाटय सादर करणार आहेत. यामध्ये १ हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मध्यमातून केला जाणार आहे. ५ ऑक्टोबरला सकाळी राहुल गांधी हे राजर्षी शाहू समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर कोल्हापुरात होत असलेल्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात १ हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत. यामध्ये सर्वधर्मीय लोक तसेच विविध स्वंयसेवी संस्थाच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल. यावेळी राहुल गांधी सर्वांशी संवाद साधणार आहेत. एनडीए सरकारमध्ये २०२४-२५ या वर्षासाठी विविध मंत्रालयांशी निगडित २४ विभागीय संसदीय स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची वर्णी लागली आहे. राहुल यांना संरक्षणविषयक समितीचे सदस्यपद देण्यात आले. काँग्रेसने केंद्र सरकारकडे सहा स्थायी समित्यांचे अध्यक्षपद मागितले होते. या पक्षाला परराष्ट्र, शिक्षण, कृषी आणि ग्रामीण व्यवहार या समित्या देण्यात आल्या आहेत.