नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचे 42 अहवाल आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम) प्रत्येकी 14 अहवाल जाहीर केले. यावेळी आयोगाने “हे अहवाल जगभरातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, निवडणूक निरीक्षकांना उपयुक्त ठरतील”, असे म्हटले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या अहवालात लोकसभा जागा, विधानसभेच्या जागा, मतदारांची राज्यनिहाय संख्या, मतदान केंद्रांची संख्या, राज्य आणि लोकसभा मतदारसंघनिहाय मतदान, पक्षनिहाय मतदानाचा वाटा, लिंगनिहाय मतदान, महिला मतदारांचा राज्यनिहाय सहभाग, प्रादेशिक भिन्नता, मतदारसंघ डेटा अहवाल, राष्ट्रीय/ राज्य पक्षांची कामगिरी, विजयी उमेदवारांचे विश्लेषण, मतदारसंघनिहाय तपशीलवार निकाल आणि बरेच काही माहिती प्रसिद्ध केली आहे.
पुढे ‘ईसीआय’ने म्हटले आहे की, देशात होत असलेल्या निवडणुकांमध्ये लोक उत्साहाने सहभागी होत आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुका आणि चार राज्यांतील निवडणुकांशी संबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुक 2024 मध्ये 64.64 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. इतर देशांच्या तुलनेत भारतातील लोकशाही अभूतपूर्व असल्याचेदेखील आयोगाचे निवडणुकांची आकडेवारी जाहीर करताना म्हटले आहे.
आयोगाने पुढे म्हटले आहे की, 2019 च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांची संख्या 46.4 टक्के वाढली आहे. 2024 मध्ये 90,28,696 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली होती. तर 2019 मध्ये ही संख्या 61,67,482 होती. आयोगाने असेही म्हटले आहे की, 2019 मध्ये 540 मतदान केंद्रांवर पुनर्मतदान झाले. तर 2024 मध्ये हे फक्त 40 मतदान केंद्रांवर झाले. एकूण 10.52 लाख मतदान केंद्रांच्या तुलनेत 0.0038 टक्के आहे.