पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिनाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या हस्ते द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथियोपिया हा इथिओपियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अद्दिस इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या विशेष समारंभात पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला.
भारत आणि इथिओपिया दरम्यानची भागीदारी अधिक समर्थ करण्याकामी दिलेल्या योगदानाबद्दल आणि जागतिक राजकारणी म्हणून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ऩिशान ऑफ इथिओपिया या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
जगातील सर्वात पुरातन संस्कृती असलेल्या देशाकडून सर्वोच्च पुरस्कार मिळणे हा आपला बहुमान आहे. हा पुरस्कार आपण भारतातील १४० कोटी नागरिकांना समर्पित करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जी२० परिषदेदरम्यान इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्याशी आपली भेट झाली तेंव्हा अहमद यांनी आपल्याला इथिओपियाला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार पहिल्यांदा संधी मिळताच आपण इथिओपियाला आलो, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी या सन्मानाबद्दल पंतप्रधान अबी आणि इथिओपियाच्या जनतेचे मनापासून आभार मानले. पंतप्रधान अबी यांचे नेतृत्व आणि राष्ट्रीय एकता, शाश्वतता आणि समावेशक विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कौतुक केले.
इथिओपियाच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या भारतीय शिक्षकांच्या योगदानाचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. कोणत्याही देशाच्या उभारणीमध्ये शिक्षण हा पायाचा दगड असतो, असे आम्ही मानतो. भारत आणि इथिओपियादरम्यानच्या विकासामध्ये शिक्षकांचे योगदान महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


